Badlapur School Rape Case Update : बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या घटनेनंतर काल बदलापुरात रेल रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे तब्बल १० तास रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला. या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बदलापुरात झालेल्या धक्कादायक घटनेनंतर दोन चिमुकल्या मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण बदलापूरकर रस्त्यावर उतरले. बदलापुरातील त्या प्रतिष्ठित शाळेसमोर पालकांनी आंदोलन केले. तर दुसरीकडे हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले. त्या नराधमाला आताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनानंतर अनेक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तब्बल दीड हजारहून अधिक लोकांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील 22 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
आता या आंदोलनकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या 22 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्व आंदोलक कर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता आंदोलनकर्त्यांचे वकील जामिनासाठी अर्ज करणार आहेत. कल्याण न्यायालयाने हा निर्णय देताच आंदोलकांच्या नातेवाईकांना कोर्टाबाहेरच हंबरडा फोडला.
बदलापुरात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड करणे, पोलिसांवर दगडफेक करणे या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात 300 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आंदोलन दरम्यान शाळेची तोडफोड, बस आणि इतर गाड्यांची तोडफोडसह बदलापूर शहरात देखील दीड हजार पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
बदलापुरात घडलेल्या त्या संतापजनक घटनेनंतर बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. ठिकठिकाणी आंदोलनं झाली. बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलकांनी रेलरोको केला. हे आंदोलन 11 तास सुरु होतं. यावेळी चिमुकल्यांच्या न्यायाची मागणी करण्यात येत होती. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसमोर आंदोलकांनी त्यांच्या मागण्या मांडल्या. या मागण्यांकडे सरकार गांभिर्यपूर्वक बघत आहे. दोघी मुलींना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय आंदोलन मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र हा जमाव आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.