Badlapur Crime Train Roko Aandolan : बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर दोन चिमुकल्या मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण बदलापूरकर रस्त्यावर उतरले. बदलापुरातील त्या प्रतिष्ठित शाळेसमोर पालकांनी आंदोलन केले. तर दुसरीकडे हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनानंतर 22 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण न्यायालयाने हा निर्णय देताच एका मुलाच्या आईने कोर्टाच्या परिसरातच हंबरडा फोडला.
शालिनी दिलीप घोलप असे या हंबरडा फोडणाऱ्या आईचे नाव आहे. बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्यांपैकी 22 जणांना ताब्यात घेतलं. यात शालिनी घोलप यांचा मुलगा रोहित यालाही ताब्यात घेण्यात आले. आज त्यांना कल्याण न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने आंदोलन करणाऱ्या 22 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर शालिनी घोलप यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांच्या व्यथा मांडली.
मी गावाला गेले होते, घरी कोणीही नव्हतं. त्याची बायको आणि तो असे दोघेजण घरात होते. तो रात्री कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला. गाड्या चालू आहेत का ते बघतो, असं तो म्हणाला आणि स्टेशनला गेला. पण पोलिसांनी त्याला आंदोलन करणाऱ्यांसोबत पकडलं. मी आता गावावरुन आले तेव्हा मला हे सर्व समजलं, असे शालिनी घोलप यांनी म्हटले.
रोहित दिलीप घोलप असे माझ्या मुलाचे नाव आहे. त्याला वडील नाहीत. मी एकटीच आहे. माझ्या मुलाला सोडा, इतकीच माझी मागणी आहे. मला त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही. माझ्या पतीचेही लॉकडाऊनमध्ये निधन झालं. आम्ही दोघंच घरात असतो. चार महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं आहे. माझा मुलगा बीकेसीमध्ये डायमंड कंपनीत काम करतो. तो या आंदोलनात सहभागी होता की नव्हता याची मला कल्पना नाही. पण मला सर्वजण सांगतात की तो फक्त बघायला गेला होता, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं. मी घरी नव्हते. माझ्या नणंदेचे पती वारले तर मी तिकडे गेले होते. मी तिथून घरी आल्यानंतर मला हे सर्व घडल्याचे समजले, असे सांगत शालिनी घोलप यांनी हंबरडा फोडला.
बदलापुरात झालेल्या धक्कादायक घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड करणे, पोलिसांवर दगडफेक करणे या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात 300 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले. तर आंदोलन दरम्यान शाळेची तोडफोड, बस आणि इतर गाड्यांची तोडफोडसह बदलापूर शहरात देखील दीड हजार पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
या आंदोलनकर्त्यांना आज रेल्वे पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या 22 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्व आंदोलनकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता आंदोलनकर्त्यांचे वकील जामिनासाठी अर्ज करणार आहेत. कल्याण न्यायालयाने हा निर्णय देताच आंदोलकांच्या नातेवाईकांना कोर्टाबाहेरच हंबरडा फोडला.