गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यातच दिवसा उकाडा आणि रात्री थंडी यामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप असे आजार होताना दिसत आहे. वातावरण बदल आणि प्रदूषणामुळे होणारे आजार तसेच त्यामुळे वाढणाऱ्या रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. त्यातच आता हिवाळा सुरु झाल्याने श्वसनाचे आजार वेगाने वाढत आहे. यातच आता बदलापुरात अतिसारामुळे एका अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या सोनिवली परिसरातील आदिवासी वाडीत गौऱ्या मिरकुटे कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरातील ६ मुलांना दोन दिवसांपूर्वी अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांची अडीच वर्षाची मुलगी सपना मिरकुटे ही मोठ्या प्रमाणात अतिसार झाला. तिला याचा जास्त त्रास झाला आणि तिची प्रकृती बिघडली.
यानंतर तिला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर कुटुंबातील इतर ५ मुलांनाही उपचारांसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्या पाच मुलांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान सध्या अतिसाराची साथ सुरू असून अनेक लहान मुलांना जुलाब उलट्या असे त्रास होत आहे. हा आजार दूषित पाण्यातून होत असल्याचे बोललं जात आहे. बदलापूरच्या चिमुकलीचाही मृत्यू दूषित पाण्यामुळेच झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अतिसार किंवा जुलाब हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो खराब खाण्याच्या सवयी किंवा दूषित पाणी पिण्यामुळे होऊ शकतो. अतिसारामुळे सैलसर पाण्यासारखे पातळ शौचास होणे, पोटात मुरड पडणे किंवा गोळा येणे, मळमळ आणि उलट्या होणे, ताप, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, अशी लक्षणे दिसतात.