बदलापुरातल्या नवीन वडवलीत घनकचरा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. ब्लास्टिंगमुळे नवीन वडवली, अंबरनाथ तसेच साई गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत. यामुळे इथल्या रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. हे ब्लास्टिंग तात्काळ न थांबवल्यास एकत्रित घनकचरा प्रकल्पाचं काम बंद पाडू, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.
बदलापूर नगरपालिका हद्दीतील नवीन वडवली या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून घनकचरा प्रकल्पाचं काम सुरू आहे. या ठिकाणी बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र या कचरा प्रकल्पाच्या नावाखाली इथला डोंगर फोडण्यात येत आहे. त्यासाठी दिवस-रात्र ब्लास्टिंगचं काम केलं जात आहे. जवळपास ६ इंच बोअरवेल मारून हे ब्लास्टिंग करण्यात येतं.
या कामाचा नाहक त्रास नवीन वडवली, नवीन अंबरनाथ तसेच साई गावातल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले आहेत. तसेच अनेक लहान मुलं रात्री दचकून जागी होतात. त्यासोबतच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. घरात धूळ येत असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार देखील झाले आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
सध्या नवीन वडवली, नवीन अंबरनाथ तसेच साई या तिन्ही गावांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या कामसाठी सुरु असलेले हे ब्लास्टिंग तात्काळ न थांबवल्यास कचरा प्रकल्पाचं काम पूर्णपणे बंद पाडू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात आहे. इथे ब्लास्ट होतात. आमच्या घरांना हादरे बसतात. मुलं दचकून उठतात. याबद्दल शासनाला वारंवार तक्रार करुन अर्ज करुनही ते काहीही दखल घेत नाही. याबद्दल आम्ही महिला आंदोलन करणार आहोत. आम्हाला धुराचा त्रास होतोय. सर्दी-खोकला, जुलाब याचाही त्रास होत आहे. सरकारने याची तात्काळ दखल घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिली आहे.