मुंबई : प्लास्टिक (Plastic) वापराबाबत नव्या राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्लास्टिक वापराबाबतच्या नव्या धोरणानुसार प्लेट्स, कप, चमचे, ग्लास आणि इतर वस्तू ज्या प्लास्टिक कोटेड आहेत, किंवा त्या प्लास्टिक लॅमिनेटेड आहेत. अशा वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी याबाबत घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पर्यावरण (Environment) विभागासोबत एक बैठक झाली होती. या बैठकीनंतर शिंदे यांनी एक जुलैपासून लागू करण्यात आलेल्या सिंगल -यूज प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीने ज्या प्लास्टिक वापराबाबत शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशींना मान्यता दिली आहे. नव्या नियमानुसार आता या वस्तूंच्या उत्पादनाला, आयात, निर्यात तसेच वापर यावर पूर्णपणे बंदी असणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडाची तरतुद देखील करण्यात आली आहे.
सिंगल -यूज प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी राज्यात समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने 18 जुलैरोजी झालेल्या बैठकीत प्लेट्स, कप, चमचे, ग्लास आणि इतर वस्तू ज्या प्लास्टिक कोटेड आहेत, किंवा त्या प्लास्टिक लॅमिनेटेड आहेत. अशा वस्तूंवर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस केली होती. राज्य सरकारने या समितीची ही शिफारस स्विकारली असून, राज्यात अशा प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. अशा प्रकारच्या प्लास्टिकचा वापर कोणी करत नाहीना, हे पहाण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आता अशा प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांवर धाडी टकाण्यास सुरुवात झाली आहे.
प्लास्टिकचा समावेश हा अविघटनशिल पदार्थांमध्ये होतो.प्लास्टिकचे विघटन लवकर होत नाही. वर्षानुवर्ष प्लास्टिक तसेच पडून रहाते. सध्या प्लास्टिकचा वापर बेसुमार वाढला आहे.प्लास्टिकचा वाढता वापर आणि ते विघटन होत नसल्याने कचऱ्यात वाढ होत आहे. सोबतच याचा मोठा फटका हा पर्यावरणाला देखील बसत आहे. प्राणी रस्त्यावर पडलेले असे प्लास्टिक खातात त्यामुळे त्यांचे आरोग्य देखील धोक्यात येते, या सर्व पार्श्वभूमीवर प्लॉस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.