अहमदनगर, शिर्डी : कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या (Sai Baba) शिर्डीतून (Shirdi) एक नवीच समस्या समोर आली आहे. दररोज हजारो भाविक साईबाबांच्या चरणांचं दर्शन घेण्यासाठी येतात. अगदी सामान्यांपासून व्यावसायिक, नेते उद्योजक, सिने तारे-तारकाही शिर्डीत दर्शन घेतात. तर आपापल्या परीने अनेकजण इथे दान करतात. शिर्डी संस्थानची तिजोरी त्यामुळे नेहमी भरभरून वाहत असते. देशातील प्रमुख श्रीमंत देवस्थानांमध्ये या देवस्थानाचीही वर्णी लागते. मात्र भक्तांनी केलेल्या एका दानामुळे सध्या संस्थानची डोकेदुखी वाढली आहे. अनेक भाविक दानपेटीत 1, 2, 5 , 10 रुपयांची नाणी टाकतात. या नाण्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर झालीय की आता बँकाही त्या स्वीकारायला तयार नाहीत.
करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांना भाविक यथाशक्ती दान देत असतात. सोने , चांदी तसेच रोख रकमेचे दानही प्राप्त होते. मात्र आता हेच दान संस्थान आणि शिर्डीतील बँकाची डोकेदुखी ठरतंय. वर्षाकाठी संस्थानला साडेतीन कोटी रुपयांचे सुट्टे नाणे प्राप्त होतात. आणि हे नाणे स्विकारण्यास बँका असमर्थता दर्शवत आहेत.
दानपेटीत येणाऱ्या नाण्यांमुळे साई संस्थानपुढे तसेच बँकापुढे देखील मोठा प्रश्न निर्माण झालाय…शिर्डी शहरा व्यतिरिक्त जिल्हयातील तसेच परजिल्हयातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते उघडण्याचं संस्थानच्या विचाराधीन आहे. तर संस्थान यातून मार्ग निघावा यासाठी थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करणार असल्याचं संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हणटलय…
साई दर्शनाला दररोज हजारो भाविक येतात आणि आपल्या इच्छेनुसार दानही करतात.. या दानामध्ये दानपेटीत येणाऱ्या सुट्या नाण्यांचा मोठा समावेश असतो.साई संस्थानच्या दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला आल्या आहेत. साईबाबांच्या दानपेटीत दर आठवठ्याला सरासरी 7 लाख तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी जमा होतात. मात्र आता नाणी स्विकारणे बॅंकांना अवघड होऊन बसलय.
शिर्डीतील 12 हून अधिक तर नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत साईसंस्थाचे खाते आहे.प्रत्येक बँकेकडे दीड ते दोन कोटींची नाणी आजमितीला पडलेली आहेत. नाण्यांच्या डोकेदुखीने चार बँकांनी यापुढे संस्थानच्या ठेवी स्विकारण्यास असमर्थता दाखवलीय. शिर्डीतील विविध बँकेच्या व्यवस्थापनाबाबत ऑन कँमेरा बोलण्याचं टाळलंय. बँकेकडे नाणे ठेवण्यास जागा शिल्लक नाही , नाण्याचा व्यवहारात विनियोग होत नाही, त्यामुळे आता भारतीय रिझर्व बँकेने याबाबत धोरण ठरवावे असे बँक व्यवस्थापनाने म्हटले आहे.