मुंबई : धाराशिव जिल्हयातील भूम आगाराच्या एसटीचा फोटो अधिवेशनात खूपच गाजला तो मोडक्या एसटीवर गतिमान सरकार अशी शासनाची जाहीरात प्रसिध्द झाल्यामुळेच. महामंडळात पूर्वी दरवर्षी साडे आठ लाख किमी रनिंग झालेल्या आणि दहा वर्षे पूर्ण केलेल्या गाड्या बाद केल्या जात होत्या किंवा त्यांच्या चेसिसवर नवीन गाडी बांधली जात होती. हे काम गेली सात ते आठ वर्षे ठप्प झाले आहे. त्यामुळे नविन गाड्या नाहीत म्हणून प्रवासी नाहीत आणि प्रवासी नाही म्हणून उत्पन्न नाही अशी एसटीची अवस्था झाली आहे.
एसटीच्या राज्याभरात तीन कार्यशाळा आहेत. त्यांची गाड्या बांधण्याची क्षमता महिन्याला सरासरी १२५ गाड्या अशी आहे. मार्च २०२३ पर्यंत ७०० गाड्या नव्याने वापरतात आणण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न होता. परंतू त्यापैकी १२५ गाड्या चलनात आल्या आहेत. आणखी २५० गाड्या मार्चपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. एसटीच्या स्वत:च्या मालकीच्या २००० गाड्याचे कंत्राट प्रक्रीया जरी सुरू केली असली तरी त्यास विलंब होणार असल्याचे याबाबत सामनात लिहीलेल्या लेखात एसटी युनियनचे नेते श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.
यामुळे नविन गाड्या महामंडळात येणे बंद झाले
एसटी मंडळाने गाड्या बांधणीचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले होते. निविदा प्रक्रिया देखील पूर्ण केली होती. परंतू त्यासाठी प्रती बस २१ लाख रूपयांचा खर्च येणार होता. मात्र हेच काम एसटीच्या स्वत:च्या कार्यशाळेत केले तर याचा गाड्या्ंची बॉडी बांधण्याचा खर्च १४ लाख येत असल्या्ने एसटीने बाहेरून गाडी बांधण्याची प्रक्रीया थांबविली आहे. त्यामुळे नविन गाड्या महामंडळात येणे बंद झाले आहे. आता भूम आगाराची बातमी झळकल्यानंतर महामंडळाने नव्या बी.एस.-६ च्या दहा गाड्या या आगाराला दिल्या आहे.१४२३ कोटी रुपयांच्या
१४२३ कोटी रुपयांच्या निधीपैकी २९८ कोटीच मिळाले
एसटी महामंडळाला ५१५० इलेक्ट्रिक बस, ५००० जुन्या वाहनांचे द्रवरूप इंधन वाहनात रूपांतर या जुन्याच योजना आहेत. गेल्या अर्थ संकल्पात स्थानक नूतनीकरण व गाड्या खरेदी करण्यासाठी १४२३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यातील फक्त २९८ कोटी रुपयांचा निधी आता पर्यंत एसटीला सरकारकडून देण्यात आला आहे. या शिवाय संप काळात कबूल करून सुद्धा वेतनाला कमी निधी देण्यात आल्यामुळे भविष्य निर्वाह निधी, उपदान, बँक कर्ज, एल आय सी, व इतर ७०० कोटी रुपयांची देणी अद्यापही प्रलंबित आहेत. त्या साठी विशेष तरतूद करायला हवी होती.पण तसे काही करण्यात आलेले नसल्याची टीका महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.