Santosh Deshmukh Murder Case : खासदाराच्या चड्डी संदर्भातील वादग्रस्त पोस्ट भोवली, त्या पोलीस अधिकाऱ्याबाबत मोठा निर्णय

| Updated on: Jan 05, 2025 | 8:14 PM

मोठी बातमी समोर येत आहे, बीडचे पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांनी खासदारासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Santosh Deshmukh Murder Case : खासदाराच्या चड्डी संदर्भातील वादग्रस्त पोस्ट भोवली, त्या पोलीस अधिकाऱ्याबाबत मोठा निर्णय
Follow us on

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीकरता आता राज्यभरात विविध ठिकाणी आक्रोश मोर्चा काढला जात आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले. पोलिसांवर देखील संशय व्यक्त केला.  त्यांनी या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर गणेश मुंडे यांनी एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट केली, हे प्रकरण आता त्यांना चांगलंच भोवलं आहे.

नेमकं काय म्हटलं होतं गणेश मुंडे यांनी? 

बीडमधील पत्रकारांसाठी पोलीस अधीक्षकांनी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे हे देखील होते, याच ग्रुपमध्ये त्यांनी वादग्रस्त पोस्ट केली होती. मी जर पत्रकार परिषद घेतली तर खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना या ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं. दरम्यान आता या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

वादग्रस्त पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. वादग्रस्त पोस्ट भोवली असून या प्रकरणात त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे. त्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती.

सोनवणे यांचा इशारा 

दरम्यान या पोस्टनंतर खासदार सोनवणे यांनी देखील गणेश मुंडे यांना चॅलेंज दिलं होतं. तुम्ही आता पत्रकार परिषद घ्याच, तुमच्या जीथे- जीथे बदल्या झाल्या त्यामागे कोण आहे? हे येत्या दोन दिवसांमध्ये समोर येईल असं सोनवणे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मुंडे यांची बदली करण्यात आली आहे, पुणे नियंत्रण कक्षात त्यांची बदली करण्यात आली आहे.