बीडः बीड (Beed city) शहरात आज एक मोठी दुर्घटना घडली. शहरात एका ठिकाणी दोन इमारतींच्या मधल्या जागेवर बांधकाम सुरु होतं. यावेळी हादरे बसल्याने एक इमारत अक्षरशः एका बाजूने कलली होती. एका सजग नागरिकाने सदर माहिती तत्काळ प्रशासनाला दिली. प्रशासकीय (Beed Administration)अधिकाऱ्यांनीही तत्काळू सूत्रे हालवत इमारतीतील नागरिकांना बाहेर काढलं. त्यापुढच्या दहा मिनिटांची दृश्य हृदयाचा ठोका चुकवणारी होती. काही क्षणातच ही चार मजली बिल्डिंग पाहता पाहता कोसळली (Building Collapse). इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. काही मिनिटांपूर्वी आपण तिथं होतो आणि आता होत्याचं नव्हतं झालं, ही दृश्य पाहून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली गेली. पण सुदैवानं सर्वांचे प्राण वाचले, यासाठीही आभार मानले गेले.
Beed Building Collapse VIDEO | पत्त्यासारखी कोसळली चार मजली इमारत, बीडमध्ये मोठी दुर्घटना, जीवितहानी टळली pic.twitter.com/toDhGniBUM
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2022
बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील दोन ईमारतींच्या मधोमध रिकाम्या जागेवर बांधकाम सुरू होते. याच दरम्यान हादरा बसून एक चार मजली ईमारत कलली होती. आता ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं पत्रकार ज्ञानेश्वर वायबसे यांना जाणवलं. त्यांनी ही माहिती तत्काळ बीड प्रशासनाला कळवली.
प्रशासनाने तातडीने हालचाली करत ईमारतीमधील सर्वच नागरिकांना बाहेर काढले. मात्र दहाच मिनिटात सदर ईमारत पत्यासारखी कोसळली. ईमारत कोसळताना चे दृष्ये मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत. प्रशासनाने वेळीच दखल घेतल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
आपल्या डोळ्यादेखत घर कोसळल्याचं पाहणं कोणत्याही नागरिकांसाठी अत्यंत क्लेशदायी असतं. पण या घटनेत या दुर्घटनेपेक्षा जास्त महत्त्वाची ठरली ती सर्वांचे प्राण वाचल्याची घटना. पत्रकार ज्ञानेश्वर वायबसे यांचे सर्व नागरिकांनी आणि प्रशासनाने आभार मानले. त्यांच्या सजगतेमुळे इमारतीतील सर्वच नागरिकांचे प्राण वाचले.
सदर इमारत अशा प्रकारे कोसळण्यासाठी कोण जबाबदार आहे, याचा तपास सध्या सुरु आहे. दोन इमारतींच्या मध्यभागी बांधकाम सुरु होतं. यावेळी बांधकामाच्या प्रक्रियेत चूक झाल्यामुळे आमची बिल्डिंग पडली, असा दावा येथील नागरिक करत आहेत. प्रशासकीय स्तरावर यासंबंधीची चौकशी होऊन प्रत्यक्ष दोषी कोण आहे, हे उघडकीस येईल.