बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणी सध्या विविध चौकशी समितींकडून चौकशी केली जात आहे. त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला सध्या वेग आला आहे. आता नुकतंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामुळे संतोष देशमुख अस्वस्थ झाले होते. अश्विनी देशमुख यांनी सीआयडीकडे याबद्दल जबाब नोंदवला आहे. यात अश्विनी यांनी, संतोष देशमुख यांना हत्येच्या एक महिना आधी धमकी मिळाली होती, अशी माहिती दिली आहे.
संतोष देशमुख यांना हत्येच्या एक महिना आधी धमकी मिळाली होती. यात त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामुळे संतोष देशमुख हे अस्वस्थ झाले होते. साधारण नोव्हेंबर महिन्यात संतोष देशमुख यांना धमकी मिळाली होती. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून ही धमकी मिळाली होती, असा खुलासा अश्विनी देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र वाल्मिक कराडला खंडणीप्रकरणी अटक झाल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही. आता यावरुन मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.