बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. त्यांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोर्चा काढण्यात येत होता. यानतंर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक होत स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जवळपास दोन तासांपासून अधिक काळ त्यांचे हे आंदोलन सुरु होते. यानंतर मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले. पाण्याच्या टाकीवरुन उतरताच धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंना मिठी मारत जोरजोरात हंबरडा फोडला.
यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “माझ्या भावाला ज्यांनी संपवलं. ज्यांनी कटकारस्थान केलं. त्यांना फाशी द्या”, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी दिली. मला अस्वस्थ वाटतंय. उलट्या होत आहेत. मी काही वेळाने बोलतो, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यांचे आदोलन सुरुच ठेवले. यानंतर बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी धनंजय देशमुख यांना आश्वासन दिले. मी एसआयटीचे अधिकाऱ्यांशी बोलणं करून देतो, असं आश्वासन एसपी नवनीत कॉवत यांनी दिल्यानंतर धनंजय देशमुख हे टाकीवरुन खाली उतरले.
याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने संवाद साधला. यावेळी तिने आम्ही न्याय मागतो. रस्त्यावर आलो. शांततेत न्याय मागतो. तरीही आम्हाला न्याय का मिळत नाही, असा सवाल उपस्थितीत केला आहे. “माझ्या घरासमोर पोलिसांचा ताफा असताना माझा चाचा आंदोलन करतोय. मग पोलीस करतात काय? आज माझे पप्पा गेले, उद्या चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? जसा चाचा वर गेलाय, आरोपींना अटक नाही झाली तर आम्ही टाकीवर जाऊ. आम्हाला काही झालं तर संपूर्ण पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. आमचा एक माणूस गेला तरी पोलीस आरोपींना पकडत नाही. मग आमच्या कुटुंबातील सर्व जातील तेव्हा पोलिसांचे डोळे उघडतील. आरोपींना पकडतील”, असे वैभवी देशमुख म्हणाली.
“आम्ही चाच्याशी बोललो नाही. तो चार दिवसापासून तणावात आहे. आम्हाला केसमध्ये काय चाललंय ते कळलं पाहिजे. आम्हाला काहीच सांगितलं जात नाही. फक्त पोलीस येतात आणि उभं राहतात. पण केसची प्रक्रिया काय चाललीय? तपास कुठपर्यंत आलाय? याची काहीच माहिती दिली जात नाही. आम्हाला त्याबाबत अजूनही काही माहीत नाही. आम्ही सर्वांनी टाकीवर चढल्यावर यांचे डोळे उघडणार आहे का?” असेही वैभवी देशमुखने सांगितले.
“आमच्या कुटुंबासोबत जे घडलं ते इतरांवर येऊ नये. महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचा आहे की मागे न्यायचा आहे. न्याय मिळत नाही. मग आम्ही तरी जगून काय करायचं? आमच्या घरातील एक सदस्य गेलाय ना. आम्ही न्याय मागतो. रस्त्यावर आलो. शांततेत न्याय मागतो. तरीही आम्हाला न्याय का मिळत नाही. आज ३५ दिवस झाले ना”, असेही वैभवी देशमुखने म्हटले.