बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र वाल्मिक कराडला खंडणीप्रकरणी अटक झाल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही. आता यावरुन मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आता याप्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी विविध आरोप केले आहेत.
बजरंग सोनावणे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाल्मिक कराड, पोलीस यंत्रणेचा तपास, एसआयटी, सीआयडी यांचा तपास यावर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले. यावेळी त्यांनी माझा एक भाऊ, एक कार्यकर्ता आधीच गेला आहे. त्यामुळे असं जीवन संपवून चालणार नाही. दुसरा आहे, त्याने अशाप्रकारे जीवन संपवण्याची भाषा करु नये, असा सल्ला बजरंग सोनावणे यांनी धनंजय देशमुख यांना दिला.
“याप्रकरणी शेतकऱ्याच्या भावना काय, जिल्ह्याच्या भावना काय त्या पाहिल्या पाहिजेत. पोलीस यंत्रणेनेही त्यापद्धतीने काम करायला हवं. पोलीस यंत्रणेचे बरेच विषय आहे. मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबद्दलचे खुलासे करणार आहे. बऱ्याच गोष्टी मी उघड करणार आहे. मी पहिल्यांदा पुरव्यानिशी सांगणार आहे. मी पहिल्यांदाला पत्रकारांसमोर कागदं घेऊन बसणार आहे”, असे बजरंग सोनावणे म्हणाले.
“माझा एक भाऊ, एक कार्यकर्ता आधीच गेला आहे. त्यामुळे असं जीवन संपवून चालणार नाही. दुसरा आहे. त्याने अशाप्रकारे जीवन संपवण्याची भाषा करु नये. मी त्यांना समजवून सांगण्यासाठीच आलो आहे. मी याबद्दल पोलीस यंत्रणेलाही जाब विचारणा आहे की तुम्ही मरणाची वाट बघताय का? त्यांना एवढी भीती वाटत आहे? जर उद्या ते बाहेर आले तर आपल्याला मारतील? अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहे. या पोलीस यंत्रणेला धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांच्या पत्नी यांनी आम्हाला त्याच्यापासून धोका आहे, असे सांगितले. मग त्यांना ३०२ मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय?” असा सवाल बजरंग सोनावणेंनी उपस्थितीत केला.
“पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही, खरंच सापडत नाही का, खरंच गुन्हेगार अजून बोलत नाही, पोलिसांना त्यांना कसं बोलतं करतात हे माहिती नाही. पोलीस कोणाला वाचवतात, SIT नेमली, तिचं काय काम आहे. एसआयटीने काय काम केलं आहे. सीआयडीला सरेंडर होतात. मी बोलल्यानंतर गाडी जप्त करण्यात आली, सीआयडीसोबत सेटलमेंट करुनच हा आरोपी सरेंडर झाला का?” असाही आरोप बजरंग सोनावणेंनी केला.