आमची चौकशी होत नाही, धमक्या दिल्या जात आहेत, त्यापेक्षा आम्हीच मरतो; धनंजय देशमुख आक्रमक

| Updated on: Jan 13, 2025 | 1:48 PM

या दरम्यान धनंजय देशमुखांनी 'टीव्ही 9 मराठी'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी "माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार", असा पावित्रा त्यांनी घेतला आहे.

आमची चौकशी होत नाही, धमक्या दिल्या जात आहेत, त्यापेक्षा आम्हीच मरतो; धनंजय देशमुख आक्रमक
Dhananjay Deshmukh andolan
Follow us on

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन सध्या राजकारण तापलं आहे. त्यातच आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून सध्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी झाले आहेत. धनंजय देशमुख हे स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. यावेळी त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान धनंजय देशमुखांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी “माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार”, असा पावित्रा त्यांनी घेतला आहे.

‘टीव्ही 9 मराठी’ने धनंजय देशमुखांशी पाण्याच्या टाकीवर आंदोलन करत असताना संवाद साधला. यावेळी त्यांनी सविस्तर भाष्य केले. “माझ्या भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझ्या चांगुलपणाचा किती फायदा घेणार. जर माझ्या चांगल्यापणाचा असा किती फायदा करुन घेणार आहात. मी शांतपणे आंदोलन करतोय, मी न्याय मागतोय, पण माझा गैरफायदा घेतला जात आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.

“…तर मी न्याय कशासाठी मागू”

“मी न्यायाची भीक मागतोय. पोलिसांनी माझी अजिबात चौकशी केली नाही. त्यांनी मला तुमचा कोणावर संशय आहे का, अशी चौकशी पोलिसांनी केली नाही. घटनाक्रम विचारला जात नाही. गाडी सापडली, चिठ्ठी सापडली याबद्दलही काहीही विचारले नाही. तपासाबद्दलही विचारलं जात नाही. मनोज दादांवरही केस टाकली जात आहे. न्याय मागताना केस दाखल केल्या जात असतील तर मी न्याय कशासाठी मागू”, असे धनंजय देशमुखांनी म्हटले.

“मी दिलेल्या जबाबाचा विचारच केला गेला नाही”

“सीआयडीकडून जी चौकशी केली जात आहे. ते लोक बाहेर येऊन आम्हाला धमकी देत आहेत. आम्हाला आरोपींचे फोटो दाखवत आहेत. आमची कोणतीही चौकशी केली जात नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही बाहेर या आणि आम्हाला मारा. त्यापेक्षा आम्हीच मरतो. मी, कुटुंब आणि गाव सर्व भीतीच्या सावटाखाली आहे. मला आतापर्यंत एकदाही चौकशीसाठी बोलवण्यात आले नाही. माझ्याकडे आरोपीबद्दल काहीही माहिती नाही, असं नाही. मी दिलेल्या पोलीस जबाबाचा विचारच केला गेला नाही. मी जो जबाब दिला होता. त्यावर त्यांनी काहीही विचारलं नाही”, असेही धनंजय देखमुख म्हणाले.

“आंदोलन कधी मागे घेईन, हे सांगता येत नाही…”

“मला खूप अस्वस्थ वाटतंय. काल दिवसभर काहीही खाल्लेलं नाही. रात्री १२ वाजता थोडंसं खाल्लं आहे. आज सकाळपासून काही खाल्लेलं नाही. जर मला न्याय मिळवताना हा त्रास होत असेल तर मला मृत्यू हे सुख वाटत आहे. मी आंदोलन कधी मागे घेईन हे मला सांगता येत नाही”, असेही धनंजय देशमुखांनी म्हटले.