बीडमधील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरण सध्या सातत्याने चर्चेत आहे. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिकी कराड असल्याचे बोललं जात असून तो मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली. आता या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी पुन्हा एकदा वर्णी लागली. त्यानंतर ते आज पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात त्यांना बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विचारणा करण्यात आले. त्यासोबत सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या विधानाबद्दल त्यांचे मत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सहा दिवसाचं अधिवेशन असून देखील चार ते साडेचार तासांचा वेळ या विषयाच्या चर्चेसाठी दिला होता. त्यावेळी सर्वांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिलं आहे. त्यात त्यांनी कोणताही शंका ठेवलेली नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की मी कोणाचाही मुलायजा ठेवणार नाही त्यानुसार ते पावलं उचलत आहेत. प्रत्येकाने भावना व्यक्त करणे यात काही गैर नाही. मात्र देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत”, असे चंद्रकात पाटील म्हणाले.
“धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील. ते याबद्दल ठरवतील. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डावा उजवा असं कधीही नसतं”, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यानंतर त्यांना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीबद्दल यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केले.
आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतली. राजकीय वाद सुरू आहे. यामध्ये काही प्रमाणात सामाजिक आणि संवेदनशील पण आहेत. यामध्ये अभिनेत्रीचे नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाहीत. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे की ते पक्षाचे आमदार आहेत. तरीदेखील तुम्ही असं काम करत आहे…हे तुम्ही असं करू नये, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.