बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणावरुन राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असून याप्रकरणी सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप होताना दिसत आहेत. एकीकडे वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असताना आता त्याच्या मुलाचा अनोखा प्रताप समोर आला आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याच्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुशील कराडने त्याच्या मॅनेजरकडून जबरदस्ती बल्कर ट्रक, कार, प्लॉट आणि सोने ताब्यात घेतल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल केली आहे. सुशील कराडने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून लूट केल्याचा आरोप केला जात आहे. येत्या १३ जानेवारीला याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
सुशील कराड याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी वकिलांनी सविस्तर माहिती दिली आहे. सुशील वाल्मिक कराड आणि त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातील पीडित महिलेचा पती जो सुशील कराड याच्याकडे काम करत होता. सुशील कराड हा त्याला कायम म्हणायचा की तू इतके पैसे कसे कमावले, तुझ्याकडे इतक्या गाड्या कशा आल्या, अशी सतत विचारणा करत मारहाण करत होता. यानतंर या तिघांनी त्याचे राहतं घर आणि जागा अनिल मुंडे याच्या नावावर करुन घेतली. त्याच्या दोन ब्लकर ट्रक आणि दोन गाड्या यांच्या चाव्या तसेच त्याची कागदपत्र त्याच्याकडे ठेवली. इतकंच नव्हे तर त्याने पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळे सोने परळीतील ज्वेलर्सला विकून त्याच्याकडून पैसे घेतले. ते पैसे त्याने स्वत:कडे ठेवले. परत त्याला मारहाण करत तू इतके पैसे कसे कमवले अशी विचारणा केली.
यानंतर त्या पीडित महिलेने वाल्मिक कराड यांचीही भेट घेतली. पण सततची मारहाण आणि रिव्हॉलव्हरच्या धाकाला कंटाळून भीतीपोटी पीडित महिला, तिचा पती आणि तिची दोन मुले ते सोलापुरात आले. यादरम्यान परळीत पीडित महिलेच्या मुलीला सुशील कराडने मारहाण केली होती. तसेच पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्या पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर या ठिकाणी लेखी तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी त्यांच्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही, असे त्या वकिलांनी सांगितले.
सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर सीपी ऑफिस, एसपी ऑफिस बीड यांना RTED ने तक्रार केली. त्यासोबत गाड्यांचे सध्याचे लोकेशन कुठे आहे, हे देखील पाठवले. पण तरीही कोणत्याही अधिकाऱ्याने तिची दखल घेतली नाही. मग शेवटी त्या पीडित महिलने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला. त्यावर आरोपीचे म्हणणे मागवले होते. यानंतर काल याप्रकरणाची सुनावणी होणार होती, मात्र आरोपीचे वकील गैरहजर राहिल्याने ही सुनावणी येत्या १३ जानेवारीला होणार आहे.