बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. त्यातच अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याप्रकरणी वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहेत. या मागणीसाठी आज मस्साजोगचे ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आले. यावेळी आरोपींना फाशी द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणावरुन वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले जात आहेत. संतोष देशमुख हत्येचा तो मास्टरमाईंड असल्याचा आरोपही होत आहे. वाल्मिक कराड हा सध्या सीआयडी कोठडीत आहे. पण त्याच्यावर अद्याप मोक्का लावलेला नाही. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यातच मस्साजोगच्या ग्रामस्थांची काल बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी आज आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून आज 13 जानेवारीला टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी बैठकीत विविध मागण्याही करण्यात आल्या. या मागण्यांसाठी आज आंदोलन केले जाणार आहे.