बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली होती. तसेच याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असेही आश्वासन दिले होते. आता शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे लोण दुसरीकडे पसरू नये, यासाठी या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे. याप्रकरणी आरोपीला अटक झाल्याचे समजते आहे. पण अद्याप याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मी याची आणखी परिपूर्ण माहिती घेत आहे. त्यानंतरच याबद्दल बोलेन, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
हिवाळी अधिवेशन चालू असताना अनेक आमदारांनी बीडचा प्रश्न सभागृहात मांडला. मला कालच एकनाथ शिंदे साहेबांनी इकडे यायला सांगितले. मी आधी पोलिसांची भेट घेतली. संभाजीनगरहून इथे येत असताना मी सतत संतोषचे फोटो बघत होतो. ते बघून माझ्या मनात चीड येत होती की इतक्या अमानुषपणे संतोषला कोण मारु शकतं. त्याच्या डोळे आणि पाठीवरचे वर्ण पाहिले. जर हे असेच वातावरण राहिले तर बीडमध्ये पुन्हा तीच दहशत निर्माण होईल, असेही संजय शिरसाट म्हणाले.
बीडमध्ये अनेक लोक या धंद्यामध्ये गुंतले आहेत. आरोपींनी लवकर अटक करणार आहे, असे इथल्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. आरोपी कोणीही असेल त्याला सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. हे लोण दुसरीकडे पसरू नये, यासाठी या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.
कोण कोणत्या पक्षाचा आहे, हा विषय आपल्या समोर नाही. माणुसकी म्हणून पाहणार आहोत. बीडमध्ये नोकरी करण्यास अधिकारी येत नाहीत. एवढी दहशत आहे. लोकांनी आता बीडचे राजकारण बदलले पाहिजे. संतोष यांची हत्या दुर्दैवी आहे. याप्रकरणी आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन मी देतो. याप्रकरणी एकाला अटक केल्याचेही समजते. पण अद्याप याबद्दल ठोस माहिती नाही. म्हणून मी यावर बोलणार नाही. न्यायाला दाबण्याचा प्रयत्न करू नका, असेही संजय शिरसाट म्हणाले.