बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. त्यातच अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच आता वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले होते. बीडमधील अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना, बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते. यानंतर आता दोन आठवड्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे.
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. बीडमधील शस्त्र परवाना रद्द प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवली आहे. त्यावेळी शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निलंबित झाल्यानंतर ही शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
या कारवाईत वाल्मिक कराड यांचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. वाल्मिक हा सध्या cid कोठडीत असल्याने त्याच्यापर्यंत अद्याप ही नोटीस पोहोचली नाही. मात्र कोठडीतून बाहेर आल्यानंतर वाल्मिकला नोटीस दिली जाणार आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे.
दरम्यान बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला आज 33 दिवस पूर्ण झाले आहेत. या घटनेतील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे हा एक आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेतील अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे अशा ७ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे.
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढला जात आहे. यावेळी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता मस्साजोग येथे ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले आहे. यात पुन्हा एकदा आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.