वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊच शकत नाही, आरोपीच्या वकिलाचा नेमका दावा काय?

| Updated on: Jan 15, 2025 | 4:39 PM

एसआयटीने मकोका कोर्टात वाल्मिक कराडचा ताबा मिळावा, यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मकोका कोर्टाने मान्य केला. यानंतर आज वाल्मिक कराडची कोठडी मिळावी यासाठी एसआयटीने कोर्टात मोठे युक्तीवाद केले. यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनीही युक्तिवाद केला.

वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊच शकत नाही, आरोपीच्या वकिलाचा नेमका दावा काय?
walmik karad
Follow us on

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दिवसेंदिवस मोठे खुलासे होताना दिसत आहे. संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्याबद्दल अटक करण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यासोबत वाल्मिक कराडवर मोक्कादेखील लावण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी आणि बीड पोलिसांकडून सुरु आहे. यानंतर एसआयटीने मकोका कोर्टात वाल्मिक कराडचा ताबा मिळावा, यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मकोका कोर्टाने मान्य केला. यानंतर आज वाल्मिक कराडची कोठडी मिळावी यासाठी एसआयटीने कोर्टात मोठे युक्तीवाद केले. यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनीही युक्तिवाद केला.

एसआयटीचे वकिल काय म्हणाले?

संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी वाल्मिक कराडचं या प्रकरणातील इतर आरोपींसोबत फोनवर संभाषण झालं होतं. संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3.15 वाजेच्या दरम्यान अपहरण झालं होतं. त्याच दिवशी दुपारी 3.20 मिनिटे ते 3.40 मिनिटे या काळात वाल्मिक कराडचं आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर वारंवार संभाषण झालं. जवळपास 10 मिनिटे त्यांच्यात संभाषण झाल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केला. यावेळी कोर्टात वकील अशोक कवडे आणि सिद्धेश्वर ठोंबरे या दोघांनी वाल्मिक करडाची बाजू कोर्टात मांडली.

“वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही”

यावेळी वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर आहे, असा युक्तीवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला आहे. “कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडचे नाव घेतले नाही. वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. वाल्मिक कराड यांची अटक बेकायदेशीर आहे”, असा मोठा दावा आरोपींच्या वकिलांनी केला. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे वाल्मिक कराड यांच्यासाठी युक्तिवाद करण्यात आला आहे.

दरम्यान वाल्मिक कराड प्रकरणाची सुनावणी केज न्यायालयात सुरु आहे. एफआयआरमध्ये संतोष देशमुख यांच्या अपहरणातील वेळ आणि आता या तीन आरोपींमधील संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे वाल्मिकचा पाय आता अधिक खोलात गेला आहे. वाल्मिक कराड याच्या दहा दिवसांच्या कोठडीची विनंती एसआयटीने केली आहे.