बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडला 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर कराड समर्थक आक्रमक झाले. त्यांनी अनेक ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. संतोष देशमुख यांच्या समर्थकांना न्याय मिळायला हवा, वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहिजे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडे मात्र या जिल्ह्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी मात्र या प्रकरणातून स्वत:ला लांब ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.
पंकजा मुंडे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बीडमध्ये सुरु असलेल्या प्रकरणावरुन विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली. मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त आहे. बीडमधील तणाव निवळावा, यासाठी आपण गृहमंत्र्यांशी चर्चा करू, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
“बीडमध्ये जे काही सुरू आहे, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी माझ्या रोजच्या नियोजनाप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर करत नाहीत. माझ्यासाठी रोजचं काम महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. बीडमध्ये सध्या जो तणाव निर्माण झाला आहे त्याबद्दल मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार आहे”, असेही पंकजा मुंडेंनी म्हटले.
दरम्यान सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीने आणि एसआयटीने कोर्टात केला. एसआयटीच्या रिमांड रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. तसेच तपास अधिकाऱ्यांनीदेखील कोर्टात मोठे गौप्यस्फोट केले. बीडच्या मकोका कोर्टात इन कॅमेरावर सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीसाठी 9 ते 10 ग्राउंडस मांडले. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल जाहीर केला. वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.