Santosh Deshmukh Murder case : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. यामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे वाल्मिक कराड अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी मस्साजोगला जातना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात ६ डिसेंबरला दोन वेळा फोनवर संवाद झाला. संतोष देशमुखांसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केल्याची माहिती समोर येत आहे. सुदर्शन घुलेने मस्साजोगच्या पवनचक्की प्लांटवर जाण्याआधी वाल्मिक कराडला फोन केला होता. यानंतर संतोष देशमुखांसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर पुन्हा एकदा सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांनी संवाद साधला होता. यानंतर ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती.
दरम्यान बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ वाशिममध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने आज वाशिममध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिमच्या श्री शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज मूक मोर्चा काढला जाणार आहे. या मूक मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित राहणार आहेत. वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख देखील मोर्चात सहभागी होणार आहेत. वाशिम शहरात ठिकठिकाणी मूक मोर्चाचे बॅनर लागले आहेत. यावर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.