Beed Valmik Karad Surrender : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.
वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने एक मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्याअनुषंगाने आता त्याची चौकशी होणार आहे. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत. त्यांच्यावर इतरही गंभीर आरोप आहेत. पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता. त्यामुळे सीआयडीने 9 पथकं तयार केली होती. त्याचा महाराष्ट्रासह कर्नाटकात शोध घेण्यात येत होता.
वाल्मिक कराड हा उज्जैनला गेल्याचंही सांगितलं जात होतं. त्यामुळे पोलीस आणि सीआयडी अलर्ट झाले होते. अखेर आज त्याने स्वत:हून पुणे पोलीस आणि सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला हत्याकांडातील आरोपी करण्यात यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल करण्यात येत आहे.
दरम्यान, शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडीओ शेअर करून आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराडने म्हटलं आहे.