बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येत आहे. त्यातच काल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक होत स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जवळपास दोन तासांपासून अधिक काळ त्यांचे हे आंदोलन सुरु होते. यानंतर मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले. पाण्याच्या टाकीवरुन उतरताच धनंजय देशमुखांनी “माझ्या भावाला ज्यांनी संपवलं. ज्यांनी कटकारस्थान केलं. त्यांना फाशी द्या”, अशी मागणी केली. आता याप्रकरणी नवीन एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एसआयटीची स्थापना केल्यानंतर बीड जिल्ह्यात महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. तसेच सोबतच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यातच आता एसआयटीची स्थापना देखील करण्यात आली होती. आता याप्रकरणी पुन्हा एक नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीचे अध्यक्ष बसवराज तेली हेच असणार आहेत. त्यातच आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या 14 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत बीडमध्ये हे जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत.
सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी आंदोलन चालू आहेत. 25 जानेवारी पासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सोबत घेऊन, सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत. तसेच सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या आणि दाखल झालेल्या गुन्ह्यावरुर राजकीय पक्ष आणि संघटना अचानक आंदोलन करत असल्याने, कुठलीही घटना किंवा तणाव निर्माण होऊ नये म्हणून बीड पोलीस अधीक्षक यांच्या कडून कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून, दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागु करण्यात आले आहेत.