बीड : बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या आई आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई रवींद्र क्षीरसागर (Rekha Kshirsagar) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत रेखाताई यांची प्राणज्योत मालवली होती. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर आज सकाळपासूनच रेखा क्षीरसागर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. क्षीरसागर कुटुंबियातील राजकीय दुरावे यावेळी गळून पडले होते. रेखाताईंच्या निधनानंतर जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) यांनी बंधू रवींद्र क्षीरसागर यांचे सांत्वन केले.
आध्यात्मिक आणि धार्मिक वृत्तीच्या असल्याने रेखाताई क्षीरसागर यांचा बीडमध्ये जनसंपर्क चांगला होता. अध्यात्म आणि योगाच्या प्रसारासाठी त्यांनी जिल्हाभर दौरे केले होते. नवगण राजूरी येथून त्यांनी अनेक वर्षे सरपंचपदही भूषवले आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत काकू-नाना विकास आघाडीकडून त्या बहिरवाडी जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या होत्या.
रेखाताई क्षीरसागर यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. राजूरी येथील त्यांच्या मूळ गावी त्यांना निरोप देण्यात आला. एरवी राजकीय मैदानावर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पुतणे संदीप क्षीरसागर आणि काका जयदत्त क्षीरसागर या दुःखद प्रसंगी एकत्र आलेले दिसून आले. आईला निरोप देताना आमदार संदीप यांना अश्रू अनावर झाले होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही क्षीरसागर कुटुंबियांचं सांत्वन केलं. जयदत्त क्षीरसागर यांनी बंधू रवींद्र क्षीरसागर यांना या दुःखद प्रसंगी आधार दिला.
इतर बातम्या-