खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करू नये, असं सांगणारी एका पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधिकारी बल्लाळ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. बल्लाळ सारखे लोक पोलीस दलात आहेत. त्यामुळेच बीडचं पोलीस दल बदनाम झालं आहे. मुन्नी बदनाम हो गयी अशी अवस्था आहे, असा हल्लाच सुरेश धस यांनी चढवला.
भाजप नेते, आमदार सुरेश धस यांनी बीडचे एसपी नवनीत कॉवत यांची भेट घेऊन महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्याची मागणी केली. महादेव मुंडे यांचे मारेकरी येत्या 15 दिवसात पकडले पाहिजे, अशी विनंतीही सुरेश धस यांनी एसपींना केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना धस यांनी पोलीस अधिकारी बल्लाळ यांच्या ऑडिओ क्लिपवर आणि बल्लाळ यांचे वाल्मिक कराडशी असलेल्या लागेबांध्यावर भाष्य केलं.
मिस्टर बल्लाळ देव. प्रभासच्या पिक्चरमध्ये होता बल्लाळ देव. बल्लाळ सारखे वागणारे अनेक लोक बीडमध्ये बरेच झाले. त्यामुळेच हे स्तोम माजलं. बीड जिल्ह्यात हे प्रकार झाले. पोलीस बळ पूर्णपणे बदनाम झालं. मुन्नी बदनाम हो गयी तशी अवस्था आमच्या पोलीस दलाची झाली. त्याचं कारण हेच आहे की बल्लाळ सारखे लोक आहेत. कालचाच व्हिडीओ काय घेऊन बसला. वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना कराडबरोबर रोहित कांबळे नावाचा त्याचा पीए कसा बसेल याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता. तो व्हिडीओ पाहिला नाही का? वाल्मिक कराड व्हॅनमध्ये बसल्यावर रोहित रोहित लवकर या, असं बल्लाळ बोलताना दिसत आहेत. अरे बापरे काय चाललंय?, असा सवाल सुरेश धस यांनी केला. काही गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले. लातूरचा जेल मागत आहेत. कशासाठी मागतात हे सांगतो. माझ्याकडे माहिती आहे, असंही ते म्हणाले.
प्रकरण एलसीबीकडे जाणार
महादेव दत्तात्रय मुंडेच्या कुटुंबाची एक मुलाखत आली होती. त्यात महादेव मुंडेंचा मुलगा दाखवला. त्याची आईही रडतेय. मुलगाही रडत आहे. 15 महिन्यापासून महादेवच्या खुन्यांचा तपास लागत नाही. आज एसपींना भेटलो. या प्रकरणाचा तपास करायला सांगितलं. त्यावेळी एसपींनी परळीचे पोलीस या प्रकरणाचा तपास करणार नाही. त्याऐवजी एलसीबीला मी हे प्रकरण देतो, असं सांगितलं. तेव्हा, एलसीबीला प्रकरण द्या. आमची हरकत नाही. पण एलसीबीचे प्रमुख शेख यांना आकानेच त्या पदावर बसवले आहे. त्यामुळे शेख वगळून ही केस एलसीबीला द्यावी अशी विनंती एसपींनी केल्याचं, त्यांनी सांगितलं.
150 कॉल का केले गेले?
रवींद्र सानप हा स्वाभिमानी अधिकारी आहे. हत्या प्रकरणात राजाभाऊ फडचं नाव गोवण्यासाठी आकाचा सानप यांच्यावर दबाव होता. फड यांच्यासोबत आणखी पाच अशा सहा लोकांना अडकवण्यास सानप यांना सांगितलं गेलं होतं. जेव्हा महादेव मुंडेंचा खून झाला या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड यांचे फोन सानप यांना गेले होते. सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहेत. सुशील आणि श्री कराड या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे या सहा जणांना 150 वेळा फोन केले. महादेव मुंडेंचा खून झाला. तेव्हा यांच्या घरातून फोन का जातात? यांना मी आरोपी मानत नाही. मग यांना 150 कॉल का गेले? सायबर तज्ज्ञ दुबे यांनी हे 150 कॉल तपासले आहेत, असा दावा त्यांनी केला.