बीडः आष्टी ते अहमदनगर (Ashti Ahmednagar) रेल्वेला अखेर मुहूर्त सापडला आहे. बीड जिल्ह्यातील (Beed District) नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून ही रेल्वे सुरु होण्याची प्रतीक्षा होती. येत्या 23 सप्टेंबर रोजी ही रेल्वे धावणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली जाईल. आष्टीतून ही रेल्वे धावण्यासाठी नागरिक अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे यशस्वी चाचणी झाल्यानंतरही ही प्रतीक्षा कायम होती. काही तांत्रिक कारणांमुळे हा मार्ग प्रलंबित होता. अखेर पुढील दहा दिवसात हा मार्ग सुरळीत सुरु होईल, अशी अपेक्षा आहे.
स्वातंत्र काळानंतर बीडच्या आष्टी तालुक्यात पहिल्यांदाच रेल्वे धावणार असल्याने नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या लोह मार्गावर हाय स्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती. मात्र रेल्वे धावण्यास विलंब होत होता. अखेर आता याचा मुहूर्त ठरला आहे. 23 सप्टेंबरला या लोहमार्गावर रेल्वे धावणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आलीय. आष्टी ते अहमदनगर या मार्गावरील काम पूर्ण झाले असले तरी बीड पर्यंत रेल्वे येण्यासाठी आणखी बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गातील नगर ते आष्टी असा 67 किमी अंतराचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यावरील रेल्वेची चाचणी यशस्वीही झाली आहे. 29 डिसेंबर 2021 रोजीही यशस्वी चाचणी पार पडली. मात्र या मार्गावरील रेल्वेचं अधिकृत उद्घाटन झालेलं नाही. त्यामुळे या मार्गावर धावणारी रेल्वे 3 महिन्यांपासून जागेवरच आहे. रेल्वे सुरु करण्याचा मुहूर्त यापूर्वी दोन वेळा जाहीर झाला. बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी विशेष लक्ष दिल्यानंतर आष्टी नगर रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार येत्या दहा दिवसानंतर हा मुहूर्त सापडला आहे. बीडपर्यंत रेल्वे कधी येईल माहिती नाही. मात्र आष्टीपासून रेल्वे सुरु होत असल्याने बीडकरांचं एक स्वप्न तरी पूर्णत्वास येत आहे.