“…यातला एकही माणूस सुटला तर राज्य बंद पाडू”, जरांगे पाटील यांचा थेट इशारा

| Updated on: Dec 31, 2024 | 2:10 PM

संतोष देशमुख यांचे कुटुंब जी मागणी करेल ते करा, आमचं कोणाचंही ऐकू नका. कुटुंबाला जे वकील हवेत ते वकील द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

...यातला एकही माणूस सुटला तर राज्य बंद पाडू, जरांगे पाटील यांचा थेट इशारा
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh
Follow us on

Manoj Jarange Patil Walmik Karad : बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांची हत्या होऊन २२ दिवस उलटले आहेत. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. त्यातच आता बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्यानुषंगानेही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता याप्रकरणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी वाल्मिक कराड शरण आल्यानतंर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. कोण शरण आलं आणि कोण नाही याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. आमच्या भावाची हत्या झाली. त्यातील आरोपी सुटता कामा नये. सीआयडी आणि पोलीस यांनी चौकशी करायची आहे. यांच्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तुम्ही आमची दिशाभूल करायची ठरवलं आहे का?

“गेल्या दोन तीन महिन्यांपासून तो कोणाकोणाशी बोललाय, त्याचे सर्व डिटेल्स काढा. ज्यांनी ज्यांनी खून पचवण्यासाठी पाठबळ दिलंय त्या सर्वांना यात घ्या. यात सर्वजण भांडतात. अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके आणि यासोबत राज्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. सर्व पक्षातील, सर्व जाती धर्मातील लोक रस्त्यावर आहेत.त्यातच हा वाल्मिक कराड जर अशी प्रतिक्रिया देत असेल, तर तुम्ही आमची दिशाभूल करायची ठरवलं आहे का, सरकारने आमची दिशाभूल करायची ठरवलं का? मुख्यमंत्री साहेब यातला एकही माणूस सुटता कामा नये, सगळे अंडरट्रक झाले पाहिजेत. मोठंमोठे वकील द्या. उज्वल निकम सारखे वकील द्या. संतोष देशमुख यांचे कुटुंब जी मागणी करेल ते करा, आमचं कोणाचंही ऐकू नका. कुटुंबाला जे वकील हवेत ते वकील द्या”, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

“फडणवीस साहेब न्याय देतील”

“पण या केसचा छडा लावा. हे जेलमध्ये सडले पाहिजे. यातला एकही माणूस सुटला, त्या दिवशी राज्य बंद पडलंच म्हणून समजा. आम्ही कोणालाही सुट्टी देणार नाही. त्यावेळी आम्ही न्याय करु. पुन्हा पुन्हा त्याच विषयी बोलायला लावू नका. यात काही गौडबंगाल केलंय का, जनता काय पागल आहे का, बाकीचे आरोपी कुठे आहेत, आमचं मुख्यमंत्र्‍यांकडे एकच मागणं आहे, देशमुख कुटुंब तुमच्याकडे डोळे लावून बसलंय. फडणवीस साहेब न्याय देतील. मराठा समाजही फडणवीस न्याय देतील अशा अपेक्षेने त्यांच्याकडे डोळे लावून बसला आहे. फडणवीस सर्वांना कायमस्वरुपी जेलमध्ये टाकतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यांनीच मी कोणालाही सोडणार नाही, असा शब्द दिला आहे. या शब्दावर मराठा समाजाचा विश्वास आहे. तो शब्द फडणवीसांनी खोटा करु नये. यातला एकही सुटला, तर यांना साथ देणार मंत्री आमदार, खासदार सुटले, तुम्ही सोडले, तरी तुम्हाला सोडलं जाणार नाही. राज्यातील मराठा एका तासात संपूर्ण राज्यात उभा राहणार”, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

“आम्हा सर्वांना मुख्यमंत्र्‍यांवर विश्वास”

“धरलेला आरोपी सुटता कामा नये. तो नाही म्हणून तुम्ही त्याला सोडून देणार का, उद्या कोणीही म्हणेल मी त्यात नाही, मुख्यमंत्र्‍यांच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही. ज्याने खून घडवलेत, खंडणी गोळा केली, याला कोणत्या खासदाराचे आमदाराचे पाठबळ आहे, हे पाहण्याचे काम मुख्यमंत्र्‍याचे नाही का, हुकूमशाही आहे का, आम्हा सर्वांना मुख्यमंत्र्‍यांवर विश्वास आहे. ते कोणालाही सोडणार नाहीत”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.