बीडः बीड जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यात भानकवाडी शिवारात दुर्दैवी घटना घडली. येथील शिवारात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी पिकांमध्ये घुसून रानडुकरं पिकांचं नुकसान करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी शेताभोवती वाघोरी लावली. वाघोरी म्हणजे एक प्रकारची जाळी, जेणेकरून वन्य प्राणी (Animals) आत येऊ शकत नाही. मात्र रानडुकरांसाठी लावलेल्या या वाघोरीत बिबट्या (Leopard) अडकल्याने त्याचा दुर्वैवी अंत झाला. शिरूर तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गंभीर म्हणजे मागील पंधरा दिवसाच अशाच प्रकारे दोन बिबट्यांचा वाघोरीत अडकून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
बीडच्या शिरूर तालुक्यातील भानकवाडी शिवारात ही घटना घडली. सकाळच्या वेळी शिवारातील वाघोरीत अडकेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे पाहून ग्रामस्थ घाबरले. त्यांनी तत्काळ वनविभागाला ही माहिती दिली. तसेच सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांच्यासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. दरम्यान वाघोरीत अडकलेल्या बिबट्याचा पंचनामा करण्यात आला. या जागेची पाहणीदेखील अधिकाऱ्यांनी केली. या परिसरात मागील पंधरा दिवसात अशा दोन दुर्वैवी घटना घडल्याचं नागरिकांनी सांगितलं.
रानडुकरांसाठी लावलेल्या जाळीत बिबट्या अडकल्याने भानकवाडी शिवार परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. जीवाच्या भीतीनं नागरिकांना आपली जनावरं एकटी सोडणं मुश्कील झालं आहे तर पोरा-बाळांनाही घराच्या बाहेर काढण्याची हिंमत होत नाहीये.