बीड : शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचा आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी संजय गायकवाड यांना दिले आहे. शिवसैनिकांना शोधून मारणार, अशाप्रकारची भाषा संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केली होती. त्यावर विचारले असता दानवेंनी हे प्रत्युत्तर दिले आहे. ते बीडमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल, तर चुन चुन के आणि गिन गिन के मारेंगे अशी डायलॉगबाजी संजय गायकवाड यांनी केली होती. याला आता शिवसेना (Shivsena) नेत्यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. संजय गायकवाड यांच्यात हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर यावे. मग कळेल कोण चुन चुन के मारेल आणि कोण गिन गिन के मारेल, असा इशारा त्यांनी गायकवाड यांना दिला आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गट हमरीतुमरीवर आला आहे. दोन्ही बाजूकडील नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात होत असतो. यंदा मात्र शिंदे गट त्यावर दावा करीत आहे. यावरून शिवसेना शिंदे गटावर टीका करत असताना त्याला शिंदे गटातील नेतेही प्रत्युत्तर देत आहेत. तर गद्दार म्हणून आमच्यावर सतत शिवसेनेचे नेते टीका करत आहेत. एकनाथ शिंदेंवर टीका करत आहेत. याच मुद्द्यावरून संजय गायकवाड यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. एकनाथ शिंदेंवर टीका केली तर चुन चुन के मारेंगे, असे त्यांनी म्हटले होते. त्याला आता अंबादास दानवेंनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे.
दसरा मेळाव्याला तयारी करायची गरज नसते. लोक उत्स्फूर्तपणे या मेळाव्याला येत असतात. आम्ही कोणताही भपकेबाजपणा करत नाहीत. लोक उत्साही असून ते आपली चटणी-भाकरी घेऊन मुंबईला येतात. लोकांना आता याची सवय झाली आहे. आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायचे. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विचार ऐकत असतात. शिंदे गटाचा मेळावा झाला तरी तो तेथे होणार नाही, हे नक्की, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.