Beed : खंडणी, दहशत आणि टोळ्यांचे राज्य, बीडची ‘राख’ रांगोळी केली कुणी? राख माफियांच्या दुनियादारीची वित्तंबातमी

| Updated on: Jan 15, 2025 | 10:48 AM

Thermal Power Station Ashes Mafia : मुक्काम पोस्ट बीड, ऊसतोड मजूरांचा जिल्हा, मराठा पातशाहीचे झेंडे अटकेपार पोहचवणाऱ्या धुरंधरांचा जिल्हा, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पवित्र स्थानही याच जिल्ह्यात, पण आज का होतोय बदनाम? बीडची 'राख' रांगोळी करणारी कोणती ही गँग?

Beed : खंडणी, दहशत आणि टोळ्यांचे राज्य, बीडची राख रांगोळी केली कुणी? राख माफियांच्या दुनियादारीची वित्तंबातमी
Follow us on

बीड. इतिहासातील अनेक मोठ्या घडामोडींचा थेट संबंध असलेला जिल्हा. भीर म्हणजे पाणी, त्याचा अपभ्रंश होऊन बीड झाले. दुष्काळाच्या छाताडावर माणुसकीची पेरण करणारा हा प्रदेश. अटकेपार झेंड रोवणाऱ्या मराठ्यांच्या मानाचे पान या जिल्ह्यातील योद्ध्यांनी कधीच भाळी लावले आहेत. वारकरी संप्रदायाची पाळमुळं रुजलेला जिल्हा. काबाडकष्ट करून अनेक चळवळींना बळ देणार्‍या या मातीला कोणी लावला बट्टा, कुणी केलं या मातीला बदनाम, पण आज का होतोय बदनाम? बीडची ‘राख’ रांगोळी करणारी कोणती ही गँग?

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या करताना सरपंचाला अनंत यातना देण्यात आल्या. तो विव्हळताना त्याचा असुरी आनंद घेणारी ही वृत्ती राज्यच नाही तर देशासमोर आली. माफियांचं राज्य लगेचच नकाशावर अधोरेखित झाले. बीडमधील खंडणी, दहशत, टोळ्यांचे राज्य समोर आले. पीक विमा घोटाळ्यापासून ते हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत अनेक प्रकरणं एकामागून एक समोर येऊ लागली. संशयाची सुई काही मंडळीपर्यंत येऊन अटकू लागली. गंदा है पर धंदा है ये म्हणत बीडमध्ये राजकीय गुन्हेगारी पोसल्याचे चित्र समोर आल्याने समाजमन हेलावले. त्याहून पोलीस यंत्रणेपासून राज्यातील बड्या यंत्रणांना सुद्धा कारवाई करताना कचरताना उभ्या देशानं पाहिलं. पोलिसांना भीती वाटावी इतकी दहशत या पट्ट्यात असल्याचे समोर आले.

दहशत, खंडणीचा परळी पॅटर्न देशात बदनाम झाला. अनेकांचे मुडदे पाडल्याचा, जमिनी बळकावल्याचा, इतरांच्या नावे संपत्तीचा, मालमत्तांचा डोलारा उभा झाल्याचे एकाहून एक प्रकरणं समोर येतच आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हे अत्याचार सुरू असल्याचा विरोधकच नाही तर सत्ताधारी आमदारांनी सूर आळवला. त्यातच परळीतील औष्णिक विद्युत केंद्राभोवतीचे अर्थकारण आणि माफियांचे राज्य चर्चेत आले. येथील दहशत, गुंडगिरी, महिन्याला कोट्यवधींची उलाढाल पुन्हा चर्चेत आली. ही गँगस ऑफ वासेपूर कोण गाडणार? कोण या दहशतखोरांच्या मुसक्या आवळणार?

औष्णिक ऊर्जा प्रकल्पाने बदलले अर्थकारण

1971 मध्ये परळीमध्ये कोळश्यापासून औष्णिक ऊर्जा निर्मितीचा श्रीगणेशा सुरू झाला. या कोळश्यामधून वर्षाला 1380 ते 1400 मेगावॅटची निर्मिती होते. या जळालेल्या कोळशामधून सुखी आणइ ओली राख बाहेर येते. 2010 पर्यंत या राखेविरोधात ओरड होत होती. ही राख प्रदूषण करते. पाणी दूषित करते. जमीन नापीक करते अशी ओरड या औष्णिक विद्यूत केंद्राजवळील गावातून होत होती. अर्थात याविरोधात अजून पण काही गावातील नागरीक आंदोलन करतातच. ओरड करतातच. पण 2010 नंतर परिस्थिती बदलली. ही राख बांधकामांमध्ये, वीट भट्ट्यांसाठी वापरली जाऊ लागली आणि अर्थकारण बदलले. या राखेवर माफियांची नजर पडली आणि पुढे या अर्थकारणाने खंडणी माफियांना, राजकीय गुन्हेगारीला अजून बळच दिले नाही तर पोसले. त्यातून उन्माद सुरू झाला.

राखेच्या मायेतून दहशत

औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी, पोलीस, महसूल आणि राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने राखेतून दहशत पसरल्याचा आरोप होतो. अनेक गावातील तरूण या व्यवसायात उतरले. वर्चस्वातून त्यांच्यात मारामाऱ्या, गोळीबार, खंडणी हे त्यांचे धंदे. या सर्वांचा एकच आका, तो म्हणजे वाल्मिक कराड. असा आरोप बीड जिल्ह्यातील विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी केला आहे. बीडमधील आर्थिक नाड्या त्याच्या हातात आहेत. बदलीपासून ते निधी वाटपापर्यंत सर्वांवर त्याची मांड असल्याचा आरोप होतो. याविषयीचे पुरावे आमदार सुरेश धस यांनी जनआक्रोश मोर्चात वाचून दाखवले. सरकारी यंत्रणा, पोलीस ही त्याच्या दिमतीला आहे.

वर्षाला 15 हजार कोटींच्या घरात उलाढाल

या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून एका दिवशी जवळपास 600 ते 700 ट्रक राख गोळा करण्यात येते. एक ट्रकमागे 18 ते 20 हजार रुपयांची कमाई होते. दिवसाला कमाईचा आकडा कोटींच्या घरात पोहचतो. तर महिन्याला जवळपास 36 कोटींच्या घरात कमाई होते. वर्षाला साधारणतः 12-15 हजार कोटींच्या घरात राख विक्रीचे गणित पोहचते. टेंडर कुणालाही मिळो. या निविदा प्रक्रिया केवळ धुळफेक असल्याचा आरोप होतो. स्थानिक कराडची माणसंच सगळा व्यवहार करतात. कोणी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर तो बंद करण्याची सर्व आयुध या गँग्स ऑफ वासेपूरकडे आहे. त्यांचा आका सर्वसहज मॅनेज करत असल्याने या तरुणांना कोणतीही चिंता नाही. आलिशान बंगले, महागड्या गाड्या, महागडी गॉगल्स, मोबाईल, कपडे यांचा थाट कोट्याधीशांना लाजवेल असा आहे. गावठी कट्टा कमरेला, कारमध्ये धार लावलेली हत्यारं असं या टोळीचं साम्राज्य आहे. रात्री या टोळ्यांनी हॉटेल्स, धाबे गजबजलेली असतात.

अत्याचाराची आकडेवारी घाम फोडणारी

राखेतून माया जमवणारी या टोळ्यांनी आता नवनवीन प्रकल्पांमध्ये एंट्री घेतली आहे. औष्णिक विद्युत केंद्र आणि राखेच्या काळ्या धंद्या व्यतिरिक्त, आता जिल्ह्यात येऊ घातलेल्या विविध विकास प्रकल्पात आपला हप्ता बांधून घेण्यासाठी ही टोळी सरसावली आहे. पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी मारहाण, अपहरण असे कारनामे करत असतानाच त्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करून आपण कसे कसाई आहोत, याची दहशत बसवण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणात सुरूवातीपासून स्थानिक पोलीस, एसआयटी इतकंच काय सीआयडी सुद्धा कारवाई करताना कचरत असल्याचे दिसले. एखादा दहशतवादी संघटनेप्रमाणे ही फिरोती गँग काम करत असल्याचे चित्र आहे. सरकारी यंत्रणेवर त्यांची पकड आहे. अधिकारी जी हुजूर करणारे आहेत. त्यांच्या दहशतीचे आकडे तुम्हाला दरदरून घाम फोडणारे आहेत. यातील अनेक प्रकरणे दाबल्या गेली आहेत. अनेकांना वाचा फुटलेली नाही. अनेक जण अजूनही दहशतीत आहेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि निर्घृण खून असो वा परळीतील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे असोत. खूनातून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते. गेल्या वर्षातील गुन्हेगारीची आकडेवारी हादरवणारी आहे. मागील वर्षात या जिल्ह्यात 36 जणांचे खून झाले आहेत. तर 168 जणांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातील अनेक प्रकरणांना या टोळींच्या दहशतीची किनार आहे. जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना तर बीडला लाजवणाऱ्या आहेत. वर्षभरात या जिल्ह्यात 156 महिलांवर बलात्कार झाले. तर 386 विनयभंगाच्या घटना नोंद आहेत. तर जे तक्रार करण्यास धजावले नाही अशांची आकडेवारी तर किती असेल हे दहशत संपल्यावरच समोर येईल.

प्रशासनाला, सरकारला जुमानते कोण?

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड, परळीतील अवैध धंद्यांना लगाम घातला गेले असे नाही. औष्णिक विद्युत केंद्रतील राखेचे ढिगारे सध्या दाऊतपूर आणि दादाहरी वडगाव या परिसरात दिसून येतात. त्याचा स्थानिकांच्या शेतीवर, पाणी साठ्यावरच नाही तर आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांच्या जीवनाला कायमचे आजारपण चिटकले आहेत. पण त्याची तमा कुणाला नाही. आकाचे बोके अजूनही प्रशासन, पोलिसांवर वचक ठेऊन आहेत. ब्र काढला की, ब्र काढण्यासाठी तुम्ही शिल्लक राहत नाहीत, हे स्थानिकांना माहिती आहे. रात्री अपरात्री रस्त्याने धावणारे यमदूत हायवा तुम्हाला या परिसरात सर्रास दिसतील. सौंदना गावच्या सरपंचाचा मृत्यू याच वाहनांच्या धडकेत झाला आहे. बीड जिल्ह्यातील अनेक प्रकरणं समोर येत असली तरी ही झुंडशाही संपलेली नाही. या टग्यांपुढे सर्वसामान्याचं आयुष्य मातीमोल आहे. इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियावर, ‘भ्रमात राहू नका’, असा इशारा देत हे टगे ‘बाप तो बाप रहेगा’ असा दम भरत असतील तर रोजच्या दोन वेळच्या जेवणाच्या भ्रांतीत असलेला सर्वसामान्य किती जीव मुठीत घेऊन जगत असेल याची कल्पना न केलेली बरी.

मास्टरमाईंड शोधा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, जयराम चाटे यांच्यावर मोक्का लावण्यात आला. तर काल वाल्मिक कराड याच्यावर सुद्धा मोक्का लावण्यात आला. ही खरीतर या टोळ्यांतील प्यादी आहेत. एका मुकादमातंर्गत काम करणाऱ्या टोळ्या आहेत. असे अजून काही मुकादम आणि त्यांच्या हाताखाली टोळ्या आहेत. एका मुकादमाला, टोळीला मोक्का लावून प्रश्न सुटणार नाही. एक आका गेला तर त्याच्या जागी दुसरा आका बसवण्यात येईल. बीड जिल्ह्यातील परळी पॅटर्नच नाही तर इतर तालुक्यातील जो कोणता पॅटर्न असेल तो बाहेर काढायला हवा. त्यांचे आका, मास्टरमाईंड शोधून काढायला हवेत. या मास्टरमाईंडला जोपर्यंत हादरा बसत नाही, तोपर्यंत अशी प्रकरणं काही दिवस लक्ष वेधतील आणि दुसरा आका पुन्हा दहशत बसवेल. राजकीय वरदहस्ताशिवाय कोणताच आका धजावत नाही. तेव्हा मास्टरमाईंडला चपराक बसत नाही, तोपर्यंत बीडवर लागलेला हा बदनामीचा कलंक पुसणार नाही.