बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या कारागृहात आहेत, तिथेच त्यांना मारहाण झाल्याची बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे बोललं जात आहे. दरम्यान या प्रकरणात आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाली असल्याची माहिती आहे. त्या संदर्भात आपल्याला काही माहिती नाही. ते आता जेल प्रशासनाला माहिती असेल. काय प्रकार झाला आहे, काय घडल आहे? ज्याबद्दल माहितीच नाही त्याबद्दल अधिकृत भूमिका आपण सांगणं बरोबर नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज काय झालं की नाही झालं की अफवा उठवली, याबद्दल कल्पना नाही. हे आरोपी सोंग करणारे आहेत. जोपर्यंत अधिकृत माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही. ते झालं की नाही झालं माहीत नाही पण ते सोंग असू शकतं. जेलमध्ये जर गँगवार झालं असेल, प्रक्रिया सुरू असेल तर ते एखाद्या वेळेस खरंही असू शकतं. तातडीने खटला चालून संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सध्या सुनावणी सुरू आहे, या हत्याप्रकरणात सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमांईंड असल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. सध्या वाल्मिक कराड हा बीडच्या कारागृहात आहे.