रात्री अपरात्री कधीही फोन करा…; बजरंग सोनावणे यांचं बीडमध्ये दमदार भाषण

| Updated on: Jul 08, 2024 | 5:46 PM

Bajrang Sonawane on Loksabha Election 2024 : खासदार बजरंग सोनवणे आज बीडमध्ये आहेत. लोकसभेचं अधिवेशन संपल्यानंतर ते मतदारसंघाचा दौरा करत आहे. यावेळी बजरंग सोनावणे यांनी दमदार भाषण केलं. रात्री अपरात्री कधीही फोन करा..., असं बजरंग सोनवणे म्हणाले. वाचा...

रात्री अपरात्री कधीही फोन करा...; बजरंग सोनावणे यांचं बीडमध्ये दमदार भाषण
बजरंग सोनवणे, खासदार
Image Credit source: Facebook
Follow us on

लोकसभेचं अधिवेशन संपल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे पहिल्यांदाच बीडमध्ये आले आहे. बीडमध्ये आल्यानंतर त्यांचा नागरी सत्कार केला जात आहे. जेसीबीने फुलं उधळत बीडकरांनी बजरंग सोनवणे यांचं जंगी स्वागत केलं आहे. यावेळी स्थानिकांशी बजरंग सोनवणे यांनी संवाद साधला. रात्री अपरात्री कधीही फोन करा, मी तुमच्यासाठी हजर असेल, असं बजरंग सोनवणे म्हणाले. मी खासदार असल्याचं त्यांना आणखीन पचत नाही, असं म्हणत बजरंग सोनवमे यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“ही देशातली पहिलीच घटना”

बीडच्या केजमध्ये खासदार बजरंग सोनावणे नागरी सत्कार करण्यात आला. तेव्हा बजरंग सोनावणे यांनी संबोधित केलं. मी राजकारणात 32 वर्ष काम केलं. मला कधीच माज आला नाही. मला मतदान करणाऱ्या सर्वच जनतेचे आभार मानतो. ज्यांनी मतदान केले नाही. त्यांचेही आभार मानतो त्यांनी पुढील वेळेस मला मतदान करावं. शपथ घेण्याच्या आधी मी खासदार म्हणून मीटिंग घेतली. हा देशातला पहिलीच घटना असावी. जनतेला स्वतः खासदार असल्यासारखे वाटेल, असं मी काम करणार आहे, असा शब्द बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.

मी 2019 मध्ये पराभूत झालो. मात्र कधीही माझा जळफळाट झाला नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केलं आहे. मतदानाच्या दिवशी हाणा- मारा असे आदेश भावाने बहिणीसाठी दिले होते. त्याचा पुरावा आहे. रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. ज्यांनी आम्हाला निवडणुकीत मदत केली त्यांना धमक्या दिल्यास गेल्या. आता हे मला सहन होणार नाही, असंही बजरंग सोनवणे यावेळी म्हणाले.

बजरंग सोनवणेंचा नागरी सत्कार

खासदार बजरंग सोनावणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. केज शहरात बजरंग सोनावणे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर बजरंग सोनवणे यांचा पहिलाच नागरी सत्कार होत आहे. जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी यावेळी करण्यात आली. बजरंग सोनवणे यांची भर पावसात विजयी रॅली देखील काढण्यात आली आहे. यावेळी बजरंग सोनवणे यांनी बीडच्या नागरिकांना संबोधित केलं.