परळी, बीड | 29 फेब्रुवारी 2024 : देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष आहे. अशात बीडच्या परळीतून महायुतीचा उमेदवार कोण असणार? याची सर्वत्र चर्चा आहे. अशात आता पंकजा मुंडे यांच्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघाऐवजी वेगळा पर्याय भाजपने समोर दिल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर धनंजय मुंडे त्यांचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील, अशीही माहिती आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्या जागी बीड लोकसभेतून पंकजा यांना उमेदवारी मिळण्याचा अंदाज आहे. जर पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर त्यांचे बंधू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे त्यांचे स्टार प्रचारक असतील अशी माहिती आहे. बीडमधून लोकसभेला कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. भाजप वरिष्ठ पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं असेल.
2019 ची विधानसभा निवडणूक तुम्हाला आठवत असेल, तर परळी मतदारसंघात अटीतटीची लढाई झाली होती. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण-भावांमध्ये विधानसभेची टफ फाईट झाली. यात तेव्हा मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे यांना पराभव स्विकारावा लागला. धनंजय मुंडे पुढे ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता मंत्री राहिले. आताची राजकीय परिस्थिती पाहता अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला आहे. या गटात धनंजय मुंडे देखील आहेत. त्यांच्याकडे कृषीमंत्रिपद देखील आहे. पंकजा मुंडे देखील बड्या नेत्या आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपचं राष्ट्रीय सचिव पद त्यांच्याकडे आहे. अशात आता परळीतून कुणाला उमेदवारी द्यायची? असा प्रश्न भाजपसमोर असताना पंकजा यांना लोकसभेचं तिकीट देण्याचा पर्याय भाजपने स्विकारलेला दिसतो.
बीडमधील एका जाहीर सभेत बोलताना पंकजा यांनी लोकसभा निवडणूक लढण्यावर भाष्य केलं होते. काहीही करेन. पण माझ्या बहीणीला खाली बसवून तिच्या जागी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. त्यामुळे आता हा नवा पर्याय पंकजा स्विकारणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.