भर थंडीत स्मशानभूमीत उपोषण, पतीचं आत्मदहन आता पत्नीचा लढा सुरु, कोणत्या प्रकरणी मूग गिळून बसलंय BEED प्रशासन ?

| Updated on: Jan 27, 2022 | 3:03 PM

शेतकऱ्याची ही विधवा पत्नी दोन दिवसांपासून स्मशानभूमीतच भर थंडीत उपोषणाला बसली आहे. मात्र अद्याप एकही प्रशासकीय अधिकारी तिकडे पोहोचला नाही. या प्रकरणात बोलण्यासदेखील तयार नाही. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच गंभीर बनण्याची चिन्ह आहे.

भर थंडीत स्मशानभूमीत उपोषण, पतीचं आत्मदहन आता पत्नीचा लढा सुरु, कोणत्या प्रकरणी मूग गिळून बसलंय BEED प्रशासन ?
भर थंडीत उपोषणाला बसलेली शेतकरी पत्नी
Follow us on

बीडः जमिनीचे क्षेत्र वाढवून मिळावे यासाठी एका शेतकऱ्याने लघु पाटबंधारे विभागातच स्वतः ला पेटवून घेऊन आत्मदहन केले होते. आता पुन्हा मयत पतीला न्याय मिळावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी बीडच्या (Beed District) पाली गावातील शेतकऱ्याच्या विधवा पत्नीने थेट स्मशानभूमीत अमरण उपोषणाला सुरुवात केलीय. शेतकऱ्याची (Farmer Wife) ही विधवा पत्नी दोन दिवसांपासून स्मशानभूमीतच भर थंडीत उपोषणाला बसली आहे. मात्र अद्याप एकही प्रशासकीय अधिकारी तिकडे पोहोचला नाही. या प्रकरणात बोलण्यासदेखील तयार नाही. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच गंभीर बनण्याची चिन्ह आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पाली गावातील शेतकरी अर्जुन कुंडलिक साळुंके यांचे शेत भूमी अभिलेख कार्यालयाकडून झालेल्या अनियमिततेमुळे कमी झाले होते. त्यासाठी अनेक वर्षांपासून त्यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु होता. मात्र या प्रकरणी दिरंगाईला कंटाळून अर्जुन साळुंके यांनी 24 नोव्हेंबर 2020 रोजी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन केले होते. बीड येथील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारातच ही घटना घडली होती. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग बीड ,भूमी अभिलेख उपअधीक्षक, बीड उपजिल्हाधिकारी (भूसंपादन या 3 अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल असून 1 वर्ष उलटून गेले तरी पोलिसांनी अद्यापही आरोपींविरुद्ध कारवाई केली नाही. घरातील कर्ता पुरुष अकाली व धक्कादायक रित्या गेल्याने पीडित परिवाराचे सामाजिक व आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान आरोपी अधिकाऱ्यांनी गुन्हा परत घेण्यासाठी पीडित कुटुंबातील व्यक्तींवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत तारामती साळुंके यांनी केली आहे. तसेच स्मशानभूमीतच (26 जानेवारी 2022 पासून) प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण चालू केले आहे.

न्याय मिळाला नाही तर हाती रुमणे घेऊ- शेकाप

देशात न्याय मिळण्यासाठी आंदोलने, उपोषण करण्याचा मार्ग लोकशाहीने दिला आहे. मात्र निगरगट्ट शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला थेट स्मशानभूमीतच उपोषण करण्याची वेळ आलीय. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आता आक्रमक झाला आहे. शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला न्याय मिळाला नाही तर हातात रूमणे घेऊ असा ईशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. जमिनीसाठी तब्बल 12 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यात पतीने जीव गमावून देखील न्याय मिळाला नसल्याने विधवा पत्नी हतबल झाली आहे. शेतकरी अत्याचाराविरोधात सरकारमधील मंत्री आणि राज्यातील अनेक पुढारी रस्त्यावर उतरण्याचा आव आणत असले तरी इथं मात्र एकही पुढारी किंवा मंत्री विधवा शेतकरी महिलेच्या मदतीला धावून आले नाहीत. हे दुर्दैव म्हणावे लागेल.

इतर बातम्या-

Funny Video : बर्थ डे पार्टीला गेला, पण गिफ्ट न देताच परतला चिमुकला; आईनं विचारलं तर म्हणतो…

Agricultural Pump : कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित, मागणी 5 हजाराची तोडगा 3 हजारावर