राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यांनी एकही उमेदवार दिलेला नाही. मात्र कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आज मोठं विधान केलं आहे. मी सरळ सांगतो तुम्हाला लिहून घेणे किचकट वाटले तर, सरळ ज्याला पाडावे वाटले तर पाडून टाका. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्या सर्वांना पाडून टाका, असं मनोज जरांगे म्हणाले. ते बीड जिल्ह्यातील गेवराईत स्थानिकांशी बोलत होते.
आम्हाला म्हणतात आमचे सरकार आल्यावर दाखवू. उभ्या रांगा धरून रपा रपा पाडा. लिहून घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही अडचणीत येऊ नका. लोकसभेला सांगितले होते आणि आता पण सांगत आहे. पाडा पाडी करा. आता गरिबाला किंमत आली आहे, चपला सगट पाय पडत आहेत. मराठा आंदोलनाला गोरगरीब मराठा आणि ओबीसी मधील छोट्या छोट्या जातीला किंमत आली. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्याला पाडा, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हे सध्या बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये आहेत. गेवराईमध्ये मनोज जरांगे यांच्या हस्ते त्यांचे समर्थक महेश दाभाडे यांच्या जनसेवा कार्यालयाचं उदघाटन करण्यात आले. या ठिकाणी गेवराई तालुक्यातील मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरु करणयात आलं आहे. ऊर्जा मंत्री गेलेला आहे आणि त्याला मराठ्यांनी कचका दाखवला आहे. मला नाही वाटत तुम्हाला सांगायची गरज आहे. शिवरायांच्या काळात संकेतिक भाषा होती. आता ही पाडायचं कसं माहित आहे. भुजबळ यांना माहीत आहे जेलात कसे जायचे… कोणाला पाडायचे याबद्दल आता संभ्रमात राहू नका. आज प्रत्येक क्षेत्रातील मराठ्याला वाटते आरक्षणशिवाय पर्याय नाही. आपण निवडणूक न लढवायची योग्य वेळी योग्य भूमिका घेतली, असं मनोज जरांगेंनी म्हटलं. मनोज जरांगेंचं भाषण सुरु असतानाच अजाण झाली. त्यामुळे जरांगेंनी भाषण थांबवलं.
आपण सर्व जाती धर्माचा सन्मान केला पाहिजे. मराठा समाजाला वाटले तर उमेदवाराकडून लिहून घ्या व्हीडीओ करा. मी राज्यातील सर्व उमेदवार यांना ओळखत नाही. गावातील माणसाला वाटते कोण निवडून येणार आहे, त्याला निवडून द्या. नाही समजलं तर पाडून टाका. मी सरळ सांगतो तुम्हाला लिहून घेणे किचकट वाटले तर, सरळ ज्याला पाडावे वाटले तर पाडून टाका. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्या सर्वांना पाडून टाका. माझा हा राजकीय दौरा नाही, हा सामाजिक दौरा आहे. आपण आपल्या आंदोलनाची तयारी करू. आपल्याला सामूहिक उपोषण करायचं आहे, असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे.