बीडः आगामी निवडणुका आणि शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये (Beed politics) पुन्हा एकदा काकांनी पुतण्यावर (Kaka-Putane) जहरी टीका केली . राजकारणात यश-अपयश येतंच असतं. एकदा निवडून आल्यावर यांना वाटतं की आपल्याला सत्तेचे पंखच फुटलेत. हे असे ऐरे गैरे नथ्थू खैरे.. यांना वाटतं की बीडचा सातबाराच आपला झालाय, अशी टीका शिवसेनेचे नेते काका जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यावर केली आहे. संदीप क्षीरसागर हे बीडचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. 2019 मधील विधानसभा निवडणुकीपासून काका-पुतण्यातील हा वाद अधिकच तीव्र होत चालला आहे. तत्कालीन निवडणुकीत राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला होता. त्यानंतर काका जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar)यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी असे वक्तव्य केलं आहे. राजकारणात जय-पराजय चालतच असतो. सत्ता काय फक्त पाच वर्षांचीच असते, पण कुणाला वाटतं आपण आयुष्यभर सत्तेत राहणार, हा त्यांचा भ्रम आहे, असं वक्तव्य काका जयदत्त क्षीरसागर यांनी केलं.
शिवसंपर्क अभियानात बोलताना काका जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ‘ राजकारणात अपयश-यश चालूच असतं. कुणी एका पराजयानं खचून जात नाही. अधिक ताकतीनं आपल्याला पुन्हा राजकारणात उतरावंच लागेल. इथं सत्तेचे पंख अनेकांकडे असतील. पण उडाण आणि झेप घेण्याची क्षमता आपल्या स्वप्नात असेल तर ध्येय दूर नाही. मग काही फरक नाहीत. कुणीही आले गेले.. ऐरे गैरे..नथ्थू खैरे… इथं फक्त नारळं फोडायचा कार्यक्रम सुरु आहे. सत्तेवर बसले म्हणून अनेकांना वाटतं आला सातबारा पक्का झाला की काय? त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून टोल कसा वसूल करता येईल, हेच पाहिलं जातंय, पण विकासाचे प्रश्न जे आम्ही आणले ते कुणीही आणले नाहीत, अशी टीका काका जयदत्त क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर केली.
बीड मधील शिवसंपर्क अभियाना दरम्यान उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर जोरदार टीका केलीय. उस्मानाबादेत आमचा पालकमंत्री आहे. तिथे महाविकास आघाडीचा धर्म पाळला जातो. मात्र बीडमध्ये उलट असल्याचं म्हणत त्यांनी थेट धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागरांवर निशाणा साधला आहे. तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाहीये त्यामुळे कृपा करुन आम्हाला डिस्टर्ब करू नका, दोन हात करायची वेळ आली तर आम्ही ही कमी पडणार नाही. असा थेट इशारा निंबाळकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत दरी पडण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या-