केज तालुक्यामधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्हा हादरला. दोन दिवसांपासून गावात चूल पेटली नाही. आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी लातूर-बीड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तर आंदोलकांनी जाळपोळ केली. या प्रकरणात एकूण 6 आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली होती तर आज पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अजून तीन आरोपी फरार असल्याचे समजते. दरम्यान या सर्व प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी एका पीएसआयला निलंबित केले आहे.
आरोपीला पुण्यातून अटक
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी अजून एका आरोपीला अटक केली. त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. काल दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने आज एकाला ताब्यात घेतले. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात आली आहे.
सीआयडी चौकशी करण्यात येणार
संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गावकऱ्यांनी सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. तर प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची पण नियुक्ती करण्यात येणार आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथक रवाना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि परळीतील व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. या घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांनी या घटनांवर चिंता व्यक्त केली. याप्रकरणी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तर आमदार संदीप क्षीरसागर या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.