बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर समाजमन सुन्न झाले. त्यांचे पडसाद राज्यभर उमटले. या हत्येप्रकरणात चार आरोपींच्या अगोदरच मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तर काल सरत्या वर्षाच्या अखेरीस वाल्मिक कराडने स्वतः पुण्यातील पाषाण रोडवरील गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) कचेरीत आत्मसमर्पण केले. त्याला अटक केल्यानंतर रात्री उशीरा केज न्यायालयासमोर हजर केले. 100 पेक्षा जास्त पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात सुनावणी पार पाडली. आता सीआयडी या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि इतर दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहे. काय आहे अपडेट?
वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी
प्रकरणात वाल्मिक कराड याला रात्री उशीरा केज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्ट परिसरात त्याचे समर्थक आणि विरोधकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे. त्याचा ठावठिकाणा माहिती करायचा आहे. कराड आणि घुले यांच्यात काय संभाषण झाले. दोघांमध्ये काय संबंध आहेत. घुले हा कराडच्या सांगण्यावरून खंडणी आणि इतर कामे करत होता का? याचा तपास करायचा असल्याने कराडच्या कोठडीची विनंती सीआयडीकडून करण्यात आली. सुनावणीअंती कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आता सीआयडी सुदर्शन घुलेच्या मागावर
संतोष देशमुख हत्येप्रकरणात सीआयडी आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या मागावर आहे. सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुले वर आहे. सुदर्शन घुले या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. खूनाच्या घटनेपासून सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. गेल्या 22 दिवसांपासून ते कुठे आहेत याचा कसून तपास करण्यात येत आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले सापडल्यास या खून प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याने कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले. आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना कुणाला व्हिडिओ कॉल याची संपूर्ण माहिती समोर येईल. त्यामुळे सीआयडी त्याच्या मागावर आहे.
कुठे लपला घुले?
सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे. तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय पोलीस यंत्रणेला आहे. त्यादृष्टीने पथकं त्यांचा शोध घेत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. वाल्मीक कराडनंतर तपास यंत्रणांचा फोकस तीन फरार आरोपींवर आहे. खुनाच्या गुन्ह्यातील तीनही आरोपींच्या CID लवकरच मुसक्या आवळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान आज सकाळीच सीआयडीची टीम सुदर्शन घुलेच्या गावात पोहोचली आहे.केज तालुक्यातील टाकळी गावात सीआयडीची टीमने तळ ठोकला आहे. सुदर्शन घुलेचा शोध सीआयडीकडून सुरू आहे. घुले आणि इतर दोन फरार आरोपींसाठी सीआयडी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहे.