….तसं झालं तर मराठा आरक्षण टिकणार नाही; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

| Updated on: Jan 21, 2024 | 10:45 AM

Manoj Jarange Patil on Maratha Reservation Rally : एका नोंदीवर 250 जणांना लाभ मिळाला असे लोक काल भेटायला आले होते. आजच अडीच कोटी मराठा आरक्षणात जाईल. अध्यादेश निघालं पण तो चालणार नाही कारण ज्याची नोंद मिळाली त्याच्याच सोयऱ्यांना मिळणार असं त्यात होतं, असं जरांगे म्हणालेत.

....तसं झालं तर मराठा आरक्षण टिकणार नाही; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?
Follow us on

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मातोरी, बीड | 21 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे असंख्य मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मातोरी गावात मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घ्यायला निघाले तर, तुमचं राजकीय अस्तित्व संपवायला मराठ्यांना वेळ लागणार नाही. 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत. सुप्रीम कोर्टातील आरक्षण आम्ही काही नाकारलं नाही. पण, ते टिकलं नाही. क्युरेटिव्ह पीटिशन ही चेंबरमध्ये होते. ओपन कोर्टात होत नाही. तसं झालं तर आरक्षण टिकणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

“आंदोलनाला डाग लागू देऊ नका”

मातोरी गावातून महाराष्ट्राच्या मराठा समाजाला विनंती आहे. सरकारला विनंती करणं आता बंद केलं. जितक्या वेळेस करायच्या तितक्या करून झाल्या. आपल्या आंदोलनाला डाग नाही लागलं पाहिजे. मराठा जातीला डाग न लागू देण्याची जबाबदारी तुमची आहे. 5 ते 10 फूट अंतर ठेवून चला. दुसऱ्या गाडीला पास होण्यासाठी जागा द्या. आपल्याला घ्यायला दुसरं गाव आलं तर त्यांना पुतळ्याच्या पुढे जाऊ द्या. स्वयंसेवक म्हणून काम करायचं हे मी आधीच सांगितलं आहे. आरक्षण तुम्ही नाही मिळवून देणार तर कोण मिळवून देणार? मराठ्यांच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत राहिली नाही, असं जरांगे पाटील म्हणालेत.

लढा अंतिम टप्प्यात

आपला लढा अंतिम टप्प्यात आहे. सरकारने आरक्षण दिलं नाही. म्हणून आज मुंबईला जाण्याची वेळ आली आहे. या गोदावरीच्या तीरावर असलेल्या दोन्ही जिल्ह्यात माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. सकाळी अंतरवालीची शिव सोडली आणि गावच्या डोळ्यात पाणी आलं. आतापर्यंत गेले तरी वापस येत होते. आज त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मलाही हुंदका आला. अर्ध्या तासात वार्ता सगळीकडे पसरली. मी भावूक झालेलो गोदापट्यात बघितलं आणि सगळे अंतरवालीकडे आले, असं जरांगे यांनी सांगितलं.

अर्ध्या तासात 10 ते 15 लाख लोक हायवेवर आला. आजच इतका मराठा समाज येईल असं वाटलं नव्हतं. पाठबळ काय असतं हे आज उभा महाराष्ट्राने बघितलं. आज कोणाच्याच शेतात माणूस दिसत नव्हता. शेवटची गाडी अंतरवालीमध्ये तर पहिली गाडी फाट्यावर होती. आम्ही गेवराईच्या पुढे 3 किलोमीटर आलो तरी पहिली गाडी अंतरवालीमध्ये होती, असंही जरांगे म्हणाले.