बीड : बीडमध्ये (Beed News) अतिशय हृदयद्रावक घटना सकाळच्या सुमारास घडली. बीडमधील परळी-गंगाखेड (Parali Gangakhed) रस्त्यावर औष्णिक विद्युत केंद्राचे राख साठवणूक तळे आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या एका डबक्यात पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. खेळायला जाते असं सांगून चार वर्षांची चिमुरडी घरातून बाहेर पडली होती. खेळता खेळता तिचा पाय घसरुन ती तलावाच्या पाण्यात पडली आणि जिवंत परतूच शकली नाही. पाण्यात पडलेल्या चिमुरडीच्या नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरुन अखेर तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत कळल्यानंतर या मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला आहे. चार वर्षांच्या चिमुरड्याच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या मुलीच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही दुःखद घटना घडली. म-त्यू झालेल्या मुलीचं नाव साक्षी पवार (Sakshi Pawar) असं आहे.
साक्षी साईनाथ पवार ही चार वर्षांची मुलगी आपल्या भावंडांसोबत खेळत होती. राखेच्या तळ्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर पवार कुटुंबीय यांचं घर आहे. आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर साक्षी तिघा भावंडांसोबत खेळायला आली होती. यावेळी पवार भावंडं राखेच्या तलावात साचलेल्या डबक्याच्या पाण्यात गेले. तिथे साक्षी आणि तिची दुसरी बहीण पाण्याच्या डबक्यात खेळू लागले. खेळता खेळता ते पाण्यात पडले. याचवेळी तिथे असलेला त्यांचा सात वर्षांचा मोठा भाऊ याने हे पाहिलं.
धावत धावत जात त्याने घर गाठलं आणि आपल्या पालकांनी याबाबत सांगितलं. साक्षीच्या वडिलांनी लगेचच तलावाच्या दिशेने धाव घेतली. यातील एका मुलीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. पण चार वर्षांच्या साक्षीचा तोपर्यंत पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. परळी गंगाखेड रस्त्यावरील पांडे पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस पवार कुटुंब राहते. राखेच्या तळ्या पासून 100 मीटर अंतरावरच त्यांचे घर आहे. सकाळच्या सुमारास ही मुले खेळत खेळत या तळ्यात गेली होती. खेळतानाच दुर्दैवाने या तीन मुलांमधील चार वर्षाची चिमुरडी साक्षी साईनाथ पवार हिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.