बीड लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे या सध्या मतदारसंघात दौरा करत आहेत. ठिकठिकाणी त्या भेटी देत आहेत. बीडच्या नाळवंडी गावात पंकजा मुंडेंनी जाहीर सभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू होताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र पंकजा मुंडे यांनी आपलं भाषण थांबवलं नाही. त्या स्थानिकांशी बोलत राहिल्या. लोकांमध्ये देखील पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना मोठा उत्साह पाहायला मिळाला. भरपावसात लोकांनी पंकजा मुंडे यांचं भाषण ऐकलं.
पंकजा मुंडे यांच्या नाळवंडीत झालेल्या भर पावसातील या सभेची आता जिल्ह्यात जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे. पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना हीच पुरवठा खंडित झाला होता. यावेळी सर्वांनी मोबाईलचे टॉर्च लावून पंकजा मुंडे यांना प्रतिसाद दिला.
पंकजा मुंडे यांचं भाषण सुरु असताना अचानकपणे पाऊस आला. पडत्या पावसात पंकजा मुंडेंनी भाषण केलं. भाषण सुरू असताना पाऊस आला म्हणजे बीड जिल्ह्याच्या उज्वल भविष्याचा संकेत आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
विरोधाकडे सध्या मुद्दा नाही. त्यामुळे तुमचं मत वायला घालू नका. बीड जिल्ह्याला विकास काय असतो, हे मी दाखवून दिलं आहे. जात-पात धर्म सोडून मला मतदान करा. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी माझ्यासाठी आणि माझ्या परिवारातील कोणासाठी मत मागायला येणार नाही, असंही देखील यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
पावसातल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी स्थानिकांना आवाहन केलं. असाच मताचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा. मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेल. मला एकदा संसदेत पाठवा. मी बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी उपस्थितांना दिलं.
मी नम्र विनंती करून मतदान मागायला आले आहे. आमच्या इथे सभा घ्या, असा फोन राज्यभरातून येत आहेत. पण इतर ठिकाणी मी सभा घेण्यापेक्षा लोकांमध्ये फिरणं मी पसंत करते. मी उमेदवार म्हणून इथं उभी आहे. बीडच्या परिस्थितीत सुधारणा हवा यासाठी मला उमेदवारी मिळाली. पूर्वीला विरोधात राष्ट्रवादीत असलेले आज माझ्यासोबत आहेत. सर्व समाजाचे लोक आज आमच्यासोबत आहेत. जातीवाद नव्हे एकच वाद केला आहे. तो म्हणजे विकास वाद…, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.