मस्साजोगचे सररपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात एका मागून एक गौप्यस्फोट होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. आष्टीचे आमदार आणि भाजप नेते सुरेश आण्णा धस यांची तोफ सातत्याने धडाडत आहे. हिवाळी अधिवेशनात त्यांच्या शब्दांना धार होती. तर आता त्यांनी परळीसह जिल्ह्यातील अनेक प्रकरणांची मालिकाच बाहेर काढली आहे. अर्थात त्यांचा विरोधाचा रोख मंत्री धनंजय मुंडे हे आहेत, हे वेगळ सांगायला नको. पण त्यांनी कागदपत्रांसह हे आरोप केल्याने बीडमध्ये बंदुकशाहीच नाही तर दहशत, अराजकतेचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. त्यातच सुरेश आण्णांनी प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांचे नाव घेत हा परळी पॅटर्न सांगितला. त्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.
जमीन बळकवण्याचा पॅटर्न
सुरेश आण्णा धस यांनी सीआयडी पथकाची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी आज संवाद साधला. मांजरसुंबा घाटाजवळ पारगाव या गावाचा त्यांनी उल्लेख केला. त्याचा तालुका माजलगाव आहे. येथील एका पॅटर्नचा उल्लेख त्यांनी केला. या भागात गायरान जमिनी बळकवण्यात आल्या. त्यासाठी तिथल्या बंजारा आणि पारधी समाजाला हुसकावण्यात आले. शिरसाळामध्ये 600 वीट भट्ट्या आहेत. या ठिकाणी अवैध वीटभट्ट्या लावण्यात आल्या. 300 हून अधिक अवैध वीट भट्ट्या लावण्यात आल्याचा आरोप धसांनी केला.
तर परळीतील काही गायरान जमिनीवर तीन वर्षांपासून बांधकाम झालेले गाळे उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. 1400 एकर गायरान जमीन बळकावल्याचा आरोप त्यांनी केला. धनंजय मुंडे यांचे बगलबच्चे हे काम करत असल्याचे ते म्हणाले. पारगाव, परळी, शिरसाळा या परिसरात त्यांची माणसं जमीन बळकावत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हनुमानाचं आणि देवीच्या मंदिराला जाणारा रस्ता सुद्धा बंद झाल्याचा आरोप त्यांनी केला. बंजारा आणि गोरगरीब पारधी समाजाच्या लोकांनी याठिकाणी वसाहत केली होती. त्यांची घरं पाडण्यात आली. त्यांना हुसकावण्यात आले. शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात आले. चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली रोड टच जमीन लाटायची, असे प्रकार सुरू असल्याचा आरोप धसांनी केला. हाच हुसकावण्याचा, जमीन लाटण्याचा परळी पॅटर्न असल्याचे ते म्हणाले.
इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स
अजून एक एक गोष्टी समोर येत आहे, अजून अनेक गोष्टी समोर येत आहे. आकाची इथं 100 एकर जमीन आहे, तिकडे जमीन आहे, अशी माहिती समोर येत आहे. आम्ही त्यांचे सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याच पसार करावा असा चिमटा धस यांनी धनंजय मुंडे यांना काढला.