बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी अपहरण झालं. धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली. या घटनेने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कालचा रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं. आज दुसऱ्या दिवशीही मस्साजोगच्या ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाडून या घटनेचा निषेध केला आहे. संतोष देशमुख यांच्या लेकीने या प्रकरणावर टीव्ही 9 मराठीशी बोलताना न्यायाची मागणी केली आहे. माझे वडील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांची अशा पद्धतीने क्रूर हत्या व्हायला नको होती. त्यांनी कोणाचेही वाईट चिंतलं नव्हतं. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असं वैभवीने म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना वैभवीला अश्रू अनावर झाले.
पोलिसांनी केवळ दोन आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींना देखील तात्काळ अटक करावी. आरोपींची नार्को टेस्ट करावी ही माझी प्रमुख मागणी आहे. माझ्या वडिलांसोबत जे घडले ते इतर कोणासोबतही घडू नये. त्यासाठी पोलिसांनी कारवाईची योग्य पाऊले उचलावीत, असं वैभवीने म्हटलं आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील या घटनेचा निषेध केला. त्यानंतर बीडचा बिहार झाला की काय असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यात मोठी दहशत झाली आहे. बीडचा बिहार झाली की काय असं वाटतंय. कुठल्याही प्रकरणात पोलीस फिर्याद घेत नाहीत. उलट फिर्यादीवरच गंभीर गुन्हे दाखल करतात. वाल्मीक कराड नावाचा माणूस हा सर्व गोष्टी घडवून आणत आहे. मी विरोधी बाकावर जरी असलो तरी गप्प बसणार नाही. या बद्दल मी विधानसभा सभगृहात आवाज उठविणार आहे, असं संदीप क्षीरसागर म्हणालेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. शरद पवार यांचीही भेट घेवून मी बीड जिल्ह्याच्या दहशतीची माहिती त्यांच्या कानावर घालणार आहे. बीडमध्ये व्यापारी देखील दहशतीत आहेत. मी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या कारखान्यावर नोटीस काढण्यात आली. माझ्या हॉस्पिटलवर सुद्धा नोटीस काढण्यात आली. मात्र मी घाबरणार नाही. लोकांसाठी मी रस्त्यावर उतरणार आहे. बीड पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलीस सध्या त्यांचे काम करतात, असा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.