बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आता सुनावणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी सतीश उर्फ खोक्याचा विषय समोर आणला जात आहे, असा आरोप देखील करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. संतोष अण्णा देशमुख यांच्या आरोपींना जे वाचवायला जातील काही दिवसात त्यांना नियती त्यांची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही. हेतूपरस्पर कोणी जर या प्रकरणाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आरोपीला कोणी वाचवायचा प्रयत्न केला, तर नियती त्याला सोडणार नाही. असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते संतोष देशमुख यांच्या घराचं भूमीपूजन झालं. यावर देखील धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष अण्णाचं स्वप्न होतं गावातलं प्रत्येक घर झाल्याशिवाय आपल्या घराकडे बघायचं नाही. परंतु मागच्या दोन महिन्यापासून मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, शिवतारे बीडचे जिल्हाप्रमुख यांनी वारंवार येऊन सांगितलं की तुमच्या कुटुंबीयांना घर देण्याची एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा आहे. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते घराचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. साहेबांची इच्छा होती, आता ती पूर्णत्वाकडे जाणार आहे, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सुरक्षेच्या कारणांमुळे संतोष देशमुख प्रकरणाचा खटला आता बीड न्यायालयात चालवला जाणार आहे, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपली देखील मागणी होती हा खटला केजऐवजी बीडला चालवण्यात यावा. सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे त्या अनुषंगाने हा खटला बीडला चालवण्यात यावा असं सगळ्यांचं मत होतं, ते योग्य झालं असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. ज्या गोष्टी आम्ही पहिल्या दिवसापासून मानत होतो. त्या तशाच्या तशा सीआयडी आणि एसआयटीच्या तपासात पुढे आल्या आहेत, नक्कीच या आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, असंही यावेळी देशमुख यांनी म्हटलं आहे.