बीड: सहनिबंधक व मुद्रांक उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे वडील रवींद्र क्षीरसागर (Ravindra Kshirsagar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संदीप क्षीरसागर यांचे बंधू आणि माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर (Arjun Kshirsagar) आणि छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांच्यासह एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा क्षीरसागर यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बीडमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. या पूर्वी या प्रकरणात माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर आज एकूण आठ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिभा क्षीरसागर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. प्रतिभा या माजी नगरसेवक सतीश पवार यांची बहीण आहेत. प्रतिभा यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भूखंड खेरीद केला होता. त्यांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे बंधू सतीश पवार हे मुद्रांक कार्यालयात आले होते. यावेळी पवार आणि क्षीरसागर कुटुंबीयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी पवार यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी, आनंद पवार, गणेश भरनाळे आणि अशोक रोमण यांच्यासह इतरांनी पवार यांना मारहाण केली होती. त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच त्यांच्याकडील पैशाची बॅगही पळवण्यात आली होती. त्यामुळे प्रतिभा यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधा गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न आणि दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यावेळी गोळीबार झाल्याचाही दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. उशिरा गुन्हा दाखल केल्यानंतर अखेर आज आरोपींना गजाआड करण्यात आले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींना कोर्टात हजर केले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
औरंगाबाद जिल्ह्यातील 5 लाख मुलांना उद्या पोलिओचा डोस, जिल्हा प्रशासन व महापालिकेची जय्यत तयारी
औरंगाबादेत जखमी अवस्थेतील दुसऱ्याही बिबट्याने घेतला अखेरचा श्वास ; वन्यप्रेमींमध्ये हळहळ