बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार तीनही आरोपींना मदत करणारा संशयित आरोपींना सीआयडीने ताब्यात घेतलं आहे. धारूरच्या कासारीतून डॉ. संभाजी वायबसे यांच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वातील एसआयटीने तिघांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांनी या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे याच्यासर सुधीर सांगळेला फरार होण्यात मदत केल्याचा संशय आहे. तीनही संशयित आरोपींची दीड तासांपासून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान अनेक खुलासे होण्याची मोठी शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. सीआयडीकडून युद्ध पातळीवर तपास सुरु आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सीआयडीने 100 पेक्षाही जास्त जणांचा जबाब नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही अटक केली. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणात सीआयडीने आरोपींच्या फोनची कॉल हिस्ट्री, सीडीआर तपासला आहे. सीआयडीला आरोपींच्या स्कॉर्पिओ गाडीतून मोबाईलदेखील सापडले आहेत. त्या मोबाईलमधून व्हिडीओ देखील प्राप्त झाल्याची चर्चा आहे. पण असं असलं तरीही तपासात आतापर्यंत काय-काय पुरावे मिळाले, याबाबत पूर्ण तपास होत नाही तोपर्यंत खुलासा होणार नाही. या प्रकरणात सीआयडीचा युद्ध पातळीवर तपास सुरु आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची आज सायंकाळी 5 वाजल्यापासून CID आणि SIT च्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास कामाला गती आलेली बघायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी नंतर आता बंधू धनंजय देशमुख यांच्याशी पथकाची सविस्तर चर्चा सुरु आहे. मात्र चार तासापासून सुरू असलेल्या चर्चेतून काय निष्पन्न झालं हे अद्याप अस्पष्ट आहे. SIT चे प्रमुख बसवराज तेली गेल्यानंतर ही संपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. अजूनही शासकीय विश्रामगृहात चर्चा सुरूच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणात मृतक संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विरोधकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी तपास यंत्रणा आणि सरकारवर मोठा दबाव आणला आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन त्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांकडून केली जात आहे. या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून पुण्यात येत्या 5 जानेवारीला रविवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची आणि संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येणार आहे.