मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सध्या विविध भागात दौरा करत आहेत. बीड जिल्ह्यातील तांदळा गावाला त्यांनी भेट दिली यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. शिवाय ‘लाडकी बहीण योजने’वरही मनोज जरांगे यांनी भाष्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. चांगली योजना आहे. तुम्ही पण सगळ्यांनी फॉर्म भरा. कारण ते आपलेच पैसे आहेत. देवेंद्र फडणवीस काय त्यांची जमीन विकून पैसे देत नाहीत. पण तुम्ही लाडकी बहिणीला पैसे दिले पण भाच्याचं काय? त्यांच्या आरक्षणाचं काय?, असा थेट सवाल मनोज जरांगेंनी केला आहे.
आमची लेकरं जेलमध्ये घातलेत. मी त्यांना सरळ करणार आहे. रेकॉर्ड शोधणे बंद आहे. हे संपूर्ण देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून होत आहे. भांडणं करून भांडणं करून मी सहा महिने ते मुदत वाढ घेतली. ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा हिशोब चुकता करणार आहे. हे सगळं जनतेच्या हातात आहे. लेकरांवर झालेला अन्याय विसरू नका. त्यादिवशी यांचा करेक्ट कार्यक्रम करा, असं मनोज जरांगे म्हणालेत.
मराठा समाजाचा धसका घेत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली होती. माञ मी डाव टाकला आणि 29 तारखेला होणारी बैठक पुढं ठेवली आणि देवेंद्र फडणवीस यांचा डाव हुकला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी वातावरण गढूळ केलं आहे. मी मॅनेज होणारा नाहीं म्हणुन माझ्याविरोधात डाव रचला जातो. हा देवेंद्र फडणवीसांचा गनिमी कावा आहे. हैदराबादला साडेतीन हजार कुणबी नोदीचे पुरावे सापडले असतानाही देवेंद्र फडणवीस इकडे आणू देत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांवर अन्याय केला आहे, असंही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. मी यांचा कार्यक्रम लावतो. आता आखाडा जवळ आला आहे. सावध राहण्याची गरज आहे. या वेळेस सगळ्यांना पाणी पाजायचे आहे. यांना यांची जागा येणाऱ्या काळात दाखून द्यायची आहे. 29 तारखेची बैठक रद्द केली. मी जर उभा करायचं म्हटलं की भाजप खुश होतं. पण मी त्यांच्यापेक्षा पुढचा आहे. या निवडणुकीत यांना पाणीच पाजायचंच आहे. यांना खुर्ची भेटू द्यायची नाही. हे सरकार मराठा समाजाचा मुळावर उठलं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.