मराठा समाजारा आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलक सुरु आहे. मागच्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटीत ते उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. मंत्री शंभुराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर मनोज जरांगेंनी काल रात्री सलाईन घेतली. त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. बीड, धाराशिव, पुण्यात बंदची हाक देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. जरांगे पाटील मागच्या पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत.जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. त्यामुळे आज बीड शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आजचा बंद शांततेत पार पडेल असं आश्वासन जरांगे समर्थकांनी दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं जन्म गाव बीड जिल्ह्यात असल्याने पहिला बंद बीडमध्ये पुकारण्यात आला आहे.
बीडमधील परळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून परळी शहरांमध्ये बंदची फेरी काढणार. आजचा हा बंद शांततेत असणार असल्याचं मराठा समन्वयकांकडून सांगण्यात आलं. बीड जिल्हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याच अनुषंगाने आज जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त असणार आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने आज धाराशिव जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. शासनाच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येणार आहे. सर्वांनी शांततेत बंद पाळावा, असं आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं. त्यामुळे आज सकाळपासून धाराशिव शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बहुतांश भागात दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. धाराशिव जिल्ह्यातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या संदर्भामध्ये सकल मराठा समाज बांधवाकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे. आज दुपारनंतर मराठा बांधव आंतरवली सराटीकडे जाणार आहेत.
उद्या रविवारी 22 सप्टेंबर पुणे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या अंतरवाली सराटीतील आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे. अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय.