‘सतीश भोसले एवढा मोठा गुंड नाही जेवढा…’, खोक्याबद्दल सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Mar 16, 2025 | 8:31 PM

आज आमदार सुरेश धस यांनी खोक्या भोसलेच्या घराला भेट दिली, यावेळी बोलताना त्यांनी वनविभागावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सतीश भोसले एवढा मोठा गुंड नाही जेवढा..., खोक्याबद्दल सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
Follow us on

फरार सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथून अटक केलं, त्यानंतर त्याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. दरम्यान त्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचं देखील समोर आलं, त्यानंतर वनविभागाकडून त्याच्या घरावर कारवाई करण्यात आली. वनविभागानं खोक्या भोसलेचं घर पाडलं. त्यांच्या पडलेल्या घराला अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्यात आली. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे. खोक्या भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान आज आमदार सुरेश धस यांनी खोक्या भोसलेच्या घराला भेट दिली, यावेळी बोलताना त्यांनी वनविभागावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस?  

100  वर्षांपासून ते येथे राहत होते, त्यांचं घर पाडलं गेलं आहे.  मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता हे घर पाडलेले आहे, ही कारवाई  त्यांनी कोणत्या नियमानं केली याचं उत्तर आम्हाला मिळालं तर बरं होईल. सतीश भोसले एवढा मोठा गुंड नाही, जेवढा मोठा करून दाखवला. आता त्याची परिस्थिती काय झाली बघा, त्याच्या कुटुंबाला राहायला घर नाही, बरं तो चुकला होता तर त्याला त्याच्या पद्धतीने सजा मिळाली पाहिजे होती, त्याच्यावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली.

वनविभागाने विदाऊट नोटीस घर पाडण्याचा हा कोणता नियम आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत आम्ही गांभीर्याने विचार करू, टेम्पररी रिलीफ देण्याचा प्रयत्न आम्ही करू, इथल्या नागरिकांना सांगू, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, माझं म्हणणं आहे की नोटीस देऊन त्याचं घर सीज करायला पाहिजे होतं. घर बंद करायला पाहिजे होतं. घर बंद केलं असंत तर काय हरकत होती. त्यांना हाकलून जरी दिलं असतं तरी चाललं असतं.  मात्र घर पाडण्यात आलं. वन हक्क पट्टा कायदा त्याला लागू होता, मात्र ते अडाणी आहेत, तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून घर पाडून टाकता हे कोणत्या नियमामध्ये बसतं? असा सवाल यावेळी सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान ढाकणे कुटुंब देखील इथे जवळच राहाते आता मी ढाकणे कुटुंबियांकडे देखील जाणार आहे, त्यांची भेट घेणार आहे. हे 307 चे मॅटर होते, यामध्ये घर पाडण्याचं काही कारण नव्हतं.  वन विभागाने कुणाच्या दबावाखाली ही कारवाई केली ते आम्ही आता बघतो, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.