परळी : परळीमध्ये (Parli) माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. कट्टर शिवसैनिकाच्या निधनानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक गटाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. अश्रुबा काळे असे या शिवसैनिकाचे नाव आहे. अश्रुबा काळे यांनी हयातभर शिवसेनेचे (shiv sena) कार्य केले. तालुक्यातील शिरसाळा या गावाचे ते रहिवासी होते. काळे हे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेकडून त्यांना मदत मिळणं अपेक्षित होतं, मात्र तसे झालं नाही. अखेर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक नसीब शेख यांनी पुढाकार घेऊन काळे कुटुंबीयांना मदत केली आहे.
अश्रुबा काळे यांची परिस्थिती बेताची होती. उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्याकडे अवघी तीन एकर शेती आहे. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत होता. उत्पन्नाचे इतर दुसरे कोणतेही साधन हाताशी नसल्याने परिस्थिती बिकट होती. अशाही परिस्थितीमध्ये अश्रुबा काळे यांनी आयुष्यभर कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी कार्य केले. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले. काळे यांच्या निधनानंतर एकाही नेत्याने त्यांच्या कुटुंबीयांची साधी भेट देखील घेतली नाही. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतात पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी देखील पैशांची कमतरता होती.
हीच अडचण लक्षात घेऊन, एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नसीब शेख यांनी अश्रुबा काळे यांच्या कुटुंबींयाची भेट घेतली. त्याच्या कुटुंबीयांना मदत केली. शेख यांनी काळे कुटुंबीयांना खरीपाच्या पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून दिले. या मदतीमुळे काळे कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतीत पेरण्यासाठी बियाणे नसल्याने काळे कुटुंबीय अडचणीत सापडले होते. मात्र त्यांची हीच अडचण एकनाथ शिंदे गटाचे समर्थक असलेल्या नसीब खान यांनी दूर केली आहे. त्यांनी काळे यांच्या घरी जाऊन त्यांना बियाने उपलब्ध करून दिले आहे. या मदतीसाठी काळे कुटुंबीयांच्या वतीने खान यांचे आभार मानण्यात आले.